राडा, हाणामारी ही शिवसेनेची ओळख राहिलेली आहे. स्थापनेपासून अशा राडेबाजीला शिवसेनेत शाबासकी मिळत आलेली आहे. अजूनही अशा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होते आहे.
प्रभादेवीला झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील राडेबाजीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाबासकीची थाप दिली आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील तिथले विभागप्रमुख महेश सावंत यांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीनंतर सावंत यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तेव्हा त्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले आणि तिथे त्यांना शाबासकी देण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्यासह या कार्यकर्त्यांचे फोटो काढून ते व्हायरल करण्यात आले आहेत.
ही शाबासकी देत असतानाच शिवसैनिकांनी संयम बाळगावा असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केल्याचे कळते.
जामीन मिळालेल्या पाच शिवसैनिकांना घेऊन विभागप्रमुख महेश सावंत हे मातोश्रीवर पोहोचले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी या पाचही जणांचे कौतुक केले. नंतर महेश सावंत यांची पत्रकार परिषदही झाली. उद्धव ठाकरे यांनी एकीकडे कौतुक केले पण शिवसैनिकांना संयम राखण्यासही सांगितले. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, मारामारी करायची नाही असे उद्धव त्यांना म्हणाले.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांनी सांगितला पेशव्यांचा पराक्रम
प्रभादेवीत ‘त्या’ ठिकाणी सापडली काडतुसाची रिकामी पुंगळी
कोकण रेल्वे आता विद्युत इंजिनच्या सहाय्याने धडधडणार
गायब झालेल्या महिला सभापतीची झाली हत्या
मागे शिवसेनाभवनाजवळ आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांशीही शिवसैनिकांची बाचाबाची झाली होती तसेच राडा झाला होता. त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांना ‘चोख’ उत्तर दिल्याबद्दल तत्कालिन मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी शाबासकी दिली होती.
रात्री ही हाणामारी झाल्यानंतर या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत यांनी स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली.