अखेर खासदार बैठकीसाठी मुख्यमंत्री घराबाहेर

अखेर खासदार बैठकीसाठी मुख्यमंत्री घराबाहेर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेतली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने न घेता प्रत्यक्ष या बैठकीला उपस्थिती लावली आहे. या बैठकीला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांसोबतच भारतीय जनता पार्टीचे खासदारही उपस्थित होते.

 

केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी पासून सुरु होत आहे. या अधिवेशनापूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसोबत महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्रात रखडलेल्या राज्यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते. राज्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे विषय केंद्रात लावून धरण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. या बैठकीत मराठा आरक्षण, जीएसटी परतावा, शेतकरी कायदे आणि आंदोलन असे विविध विषय चर्चेला येणार होते. या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निवासस्थान बाहेर पडून व्यक्तिशः हजेरी लावली आहे. या आधी मुख्यमंत्री ठाकरे हे सर्व बैठकींना व्हर्च्युअल पद्धतीने हजर असायचे. या कारणास्तव त्यांच्यावर टीकेची झोडही उठली होती. पण आता उद्धव ठाकरे यांनीही घराबाहेर पडणे सुरु केले असून ते बैठकांना उपस्थिती दर्शवू लागले आहेत.

 

नारायण राणेंची दांडी
उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी हजेरी लावली असली तरीही भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. नारायण राणे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे कटू संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळेच राणे यांनी बैठकीला येणे टाळल्याचे म्हंटले जात आहे. 

Exit mobile version