पोलिसांनो, प्रत्येक लाठीचा हिशेब द्यावा लागेल!

उद्धव ठाकरेंनी महाडमध्ये पोलिसांनाच भरला दम

पोलिसांनो, प्रत्येक लाठीचा हिशेब द्यावा लागेल!

उद्धव ठाकरे यांनी महाडमध्ये बारसूतील रिफायनरीच्या निमित्ताने भाषण केले पण त्या भाषणात नेहमीच्या मुद्द्यांचा उल्लेख करतानाच त्यांनी पोलिस दलावरच शरसंधान केले. बारसू येथे उद्धव ठाकरे शनिवारी दौऱ्यावर गेले होते. तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी पोलिसांनाच सुनावले.

ते म्हणाले की, महाराष्ट्राचे पोलिस बारसूत सगळीकडे दिसत आहेत. घराघरात पोलिस आहेत, गच्चीत आणि बाल्कनीतही दिसत आहेत. बाथरूममध्येही असतील. काय चालवलंय. एवढा बंदोबस्त चीन सीमेवर लावा. चीन देशाची सीमा कुरडत आहे. पण बारसूत पोलिस भूमीपुत्रावर लाठ्या चालवत आहेत अश्रुधूर सोडत आहेत. कुठली लोकशाही? पोलिस दल का आणता? मी पोलिसांना बाजुला केलं आणि जनतेत उभा राहिलो.

उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना जबाबदार धरत त्यांचा हिशेब चुकता करण्याची भाषा वापरली. ते म्हणाले की, खुर्ची मिळाली म्हणून पोलिसी दंडुकेशाहीचा वापर केला जात आहे, अत्याचार केला जातो आहे. सरकार येतं जातं पण लोकांवर लाठ्या मारू नका. उद्या येणारं सरकार आपलं असणार आहे. मी कधी सूडवृत्तीने वागलो नाही. पण तुम्ही कायद्याचं पालन करा. अत्याचार कराल तर एकेका लाठीचा हिशोब मागू.

उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा या भाषणातही हात घातला. नेहमी सत्ता असते तर सत्तेकडे सगळे जातात माझ्याकडे तर आता सत्ता नाहीए. त्यांनी पाठीवर वार केला गद्दारी केली. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्याप्रती सहानुभूती दाखविण्याची अपेक्षा उपस्थित श्रोत्यांकडून केली. ते पुन्हा म्हणाले की, माझा धनुष्यबाण चोरला, नाव चोरलं आणि त्यांच्या डोक्यावर मारलं. माझ्या हातात आता काही नाही.

उद्धव ठाकरेंनी विरोधकांना गाडण्याची भाषाही केली. या मतदारसंघाबद्दल मी मुद्दामहून माहिती घेतली. महाडमध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत. रायगड, मुरारबाजी स्मारक, चवदार तळे… एवढे असताना भगव्याला कलंक लावण्याची कुणाची हिंमत आहे, त्या डाग लावणाऱ्यांना माहीत नाही या पवित्र मातीत गाडू.

मला खोटं बोलता येत नाही, मी पाप केलेलं नाही. मी मुख्यमंत्री असताना ठरवलं. रिफायनरी नाणारहून हाकलून दिली. पण नंतर दिल्लीतून फोन आले गद्दार माझ्याकडे यायचे साहेब मोठा प्रकल्प आहे. तो विनाशकारी असेल तर जाऊद्याना गुजरातमध्ये. तिकडे कुणाचा विरोध नाहीए. वस्त्या नाहीत. गाव नाही. पर्यावरणाची हानी नाही. ओसाड जमीन आहे. मी पत्र दिलं. सिक्वेन्स सरकार पाडलं आणि संमती आली. मी म्हणालो होतो त्यांना की, तिथे जाईन जनतेला विचारीन हो बोलले तर प्रकल्प येईल. नाही तर गेटआऊट. हे का सांगत नाहीत.

हे ही वाचा:

एक पटकथा, दोन भाकीतं आणि तीन विकेट

‘अजित पवारांचं वागण बघूनचं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट मध्यप्रदेशात टॅक्स फ्री; आता महाराष्ट्रातही मागणी !

बारसूत लोकभावनेबद्दल बोलणाऱ्यांनी महापौरांचा बंगला कसा ढापला?

बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढल्याची आठवण पुन्हा एकदा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य़ करण्याची संधी उद्धव ठाकरेंनी साधली. बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढला. हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून. कर्नाटकमध्ये पंतप्रधान धार्मिक प्रचार करत नाहीत का?

उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने आपल्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र यांच्याशी जोडले.  छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेना संपवायला आले आहेत, तुमचं काय करायचं. प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण गद्दारांना दिलात. तो छत्रपतींचा अपमान नाही. तो प्रभू रामचंद्राचा अपमान नाही. सत्यपाल मलिक, प्रियांका गांधी यांचेही कौतुक उद्धव ठाकरे यांनी केले.

Exit mobile version