लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं असून ठाकरे गटाने या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. यावरून ठाकरे गटावर चौफेर टीका केली जात असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, वक्फचा विषय हा बुधवारी मुद्दाम आणला गेला. अमेरिकेने भारताला सांगितलं होतं की, कर कमी करावे नाहीतर आम्हीही कर लादू. याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून वक्फ विधेयक मांडलं गेलं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. देशाला विश्वासात घेणं आवश्यक होते. परिणामांची चर्चा सरकारने करायला हवी होती. करोना काळात मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदीही घरी बसूनच काम करत होते. तसं काहीतरी करुन मोदींनी अमेरिकेच्या करांबाबत सांगितलं असतं तर पाठिंबा दिला असता, असं उद्धव ठकारे म्हणाले.
वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, वक्फच्या जमिनी ताब्यात घेणार असं दिसत असून जमिनींवर डोळा आहे. मोहम्मद अली जिना यांना लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू अमित शाह यांच्यापासून सगळ्यांनी चर्चेत घेतली. देशाच्या इतिहासात मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं सगळ्यांनी केली. हे बिल मुस्लिमांच्या बाजूने आहे की विरोधात आहे? जर बाजूने असेल तर मग तुम्ही हिंदुत्व सोडलं का? याचे स्पष्टीकरण द्यावे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, नुकतीच ईद झाली असून ईदवेळी सर्वांनी ईदच्या मेजवान्या झोडल्या. आता ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं. योगायोग आहे की, किरेन रिजिजू यांनी पूर्वी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. त्यांनीच हे बिल मांडलं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भाजपाचे नेमके काय ते काळात नाही कधी सांगतात औरंगजेबाची कबर खोदणार आणि त्यांची लोकं कुदळ फावडं घेऊन जातात, मग म्हणतात अरे परत माती टाका. यांची लोकं म्हणतात मशिदीत जाऊन मारू. मग मारायला जातात त्यांना सांगतात हत्यार बाजूला ठेवा आणि सौगात ए मोदी घेऊन जा. लोकांना झुंजवायचं आणि आपल्या पोळ्या भाजायच्या, असं सुरू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ठाकरे म्हणाले की, वक्फ बोर्डातील काही सुधारणा चांगल्या आहेत. पण यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे. ३७० कलमाला आम्ही पाठिंबा दिला होता. काश्मीरमधील अनेक निर्वासित इकडे तिकडे फिरत होते. त्यांना शिवसेना प्रमुखांनी आसरा दिला. ३७० कलम हटवलं. किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झालं? काश्मिर पंडितांना त्यांच्या घरी का जाता येत नाही? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
जमीन हवी असेल तर सरकारने चीनने बळकावलेली जमीन परत मिळवून घ्यावी. सरकारी जागा मित्रांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. लोकांना लढवायचं आणि आपण बाजूला व्हायचे, हे भाजपचे राजकरण आहे. विरोधकांनी सुचविलेल्या सुधारणांकडे दुर्लक्ष केले. विरोधकांची मते जाणून घेतली असती तर बुधवारी लोकसभेत विधेयकावर इतकी चर्चा करावी लागली नसती. तोडा, फोडा आणि राज्य करा, ही भाजपची रणनिती आहे. वक्फ विधेयक मुस्लिमांच्या बाजूने आहे की, विरोधात आहे, हे सरकारने स्पष्ट करावे, असे ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा..
बँकॉकमधील स्वागताने पंतप्रधान मोदी भारावले
मोदी म्हणतात, रामायण हृदय आणि परंपरांना जोडते
मुस्लिमांची प्रगती बघवत नाही म्हणून वक्फ विधेयकाला विरोध
तो पाच दिवस इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत होता…
उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्यावर काँग्रेसचा दबाव आहे, भाजपचा दबाव आहे असं काही नाही. जे पटतं ते करतो. वक्फ बोर्डावर नियंत्रण आणताय ठीक आहे, त्याचं स्वागत पण ज्या पद्धत्तीने भाजपचं पाऊल पडतायत. उद्या तुम्ही हिंदूंवर पण नियंत्रण आणाल. हिंदुत्वाचे राखणदार आहात तर मुसलमानांची इतकी बाजू का घेतायत. हिंदूंमध्ये गरीब नाही का, मुस्लीम गरिबांना काय फायदा होणार आहे, असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत. तुम्ही मुसलमानांचे लांगुन चालन करत असताना आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही?. मी भाजपचे आभार मानेन. वक्फ बोर्डाचा विषय घेतला, त्यामुळे भाजपचं खरं रुप काय हे कळालं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.