विश्वासघात…पालापाचोळा…खंजीर…भाजपाचे कारस्थान…पुन्हा तेच; उद्धव ठाकरे यांची मुलाखत

विश्वासघात…पालापाचोळा…खंजीर…भाजपाचे कारस्थान…पुन्हा तेच; उद्धव ठाकरे यांची मुलाखत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली परंपरा कायम ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा यांच्यावर टोमणे लगावले. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी विश्वासघात केला, खंजीर खुपसला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यामागे भाजपाचे कारस्थान असल्याचंही ते म्हणाले.

राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे शांत का दिसत आहात, असा सवाल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना केला. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  सध्या आजूबाजूला फक्त पालापाचोळा उडतोय. तो शांत झालं की सगळ नीट चित्र सगळ्यांना दिसेल. सध्या स्वतःची चिंता नाही तर मराठी माणसाची आणि हिंदुत्वाची चिंता आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पानं गळण गरजेची असतात आणि आता ही सडलेली पानं गळतायत. पानझड होते पण पुन्हा नव्याने अंकुर येतात. या पानांचं झाडाकडून सगळं घेऊन झालंय त्यामुळे आता ते निघून जात आहेत, असे टोमणे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांना लगावले.

विश्वासघातकी लोकांनी मागून वार केला. शस्त्रक्रिया झाल्या पण त्या अनुभवातून सहानभूती नको. रुग्णालयात असताना हातपाय हलत नव्हते, जागेवरून हलता येत नव्हतं तेव्हा कानावर येत होतं की माझी प्रकृती सुधारावी म्हणून देवावर अभिषेक करत होते तर काही जण प्रकृती सुधारू नये म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेले. मी आजारी असताना पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती पण यांनी तेव्हाच हालचाली केल्या, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

आपलं म्हटल्यावर आपलं अशी बाळासाहेबांची शिकवण आहे. आमची चूक म्हणजे आम्ही विश्वास नाही तर अंधविश्वास ठेवतो. भाजपाने आता जे केलं ते तेव्हाच बोलणी झाल्यावर केलं असत तर अधिक सन्मानाने सगळं झालं असतं. आताचा विमानांचा आणि इतर अतिरिक्त खर्च वाचला असता, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला.

भाजपाला शिवसेना संपवायची आहे. यापूर्वी शिवसेना संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण शिवसेना पुन्हा जोमाने आणि ताकदीने उभी राहिली. भाजपा आणि शिवसेना यांच्या हिंदुत्वामधला फरक काय आहे तर हिंदुत्त्वासाठी आम्ही राजकारण केलं तर त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व घेतलं. मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांमधून एक उदाहरण द्या ज्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलंय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना आणि संघर्ष हे एकमेकांच्या पाचवीला पुजलेले आहेत. शिवसेना ही एक तळपती तलवार आहे आणि त्यामुळे म्यानात ठेवली तर ती गंजणार. शिवसेना आधी भूमिपुत्रांसाठी लढली नंतर हिंदुत्वासाठी लढली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली ती ठाण्यात आणि आता आव्हान मिळतंय ते सुद्धा ठाण्यात. पण ठाणेकर सुज्ञ आहेत. आता जो पालापाचोळा उडतोय ती काय शिवसेना नाही. महाराष्ट्राची जनता आता निवडणुकांची वाट पाहतेय. आम्ही चूक केली असेल तर जनता आम्हाला घरी बसवेल किंवा त्यांनी चूक केली असेल तर त्यांना बसवेल. जनतेच्या कोर्टात काय तो निर्णय होऊ द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. एक कायदा व्हायला हवा. युती सरकारमध्ये जे करार होतात ते जनतेसमोर ठेवा. सगळी माहिती समोर आणा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. सध्या शिवसेना हायजेक करण्याचा प्रयत्न होतोय कारण त्यांना दुसरा मार्ग नाहीये. बंडखोरांना कुठल्यातरी पक्षात जावं लागेल त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी बोलत असताना अजित पवारांनी कधी माइक खेचला नाही कारण, आमच्यात समन्वय आणि सभ्यता होती. महाविकास आघाडी प्रयोग चुकला असता तर जनतेने उठाव केला असता. आता लोक वाट बघतायत निवडणुकीची. शिवसेना कोणाची खरं हे सिद्ध करण्यासाठी पुरावे देण्याची गरज नाहीये. जनतेला पुरावे नकोत पण जनता यांना पुरावा देईल. राजकारणात पुरून टाकेल जनता, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी लगावला.

हे ही वाचा:

मुंबईच्या धर्मेश बराईचा जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मान

पाचव्या मजल्यावरून चिमुरडी पडली! तिला कुणी झेलले?

पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी

“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”

भाजपाला शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत. आपल्याकडून आदर्श निर्माण होत नाही तर दुसऱ्यांचे पळवायचे असतात. बाळासाहेब ठाकरेंचा आदर करावाच लागेल नाहीतर जनता यांना मारेल. पण तरीही बाळासाहेबांचा फोटो लावून मत घेऊ नका. माझे वडील का चोरताय? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

आता जे गेलेत त्यांना मुख्यमंत्री पद देऊन तरी त्यांनी काय वेगळं केलं असत? त्यांची हाव संपत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

मी घराबाहेर न पडणं ही तेव्हाच्या काळाची गरज होती. मीच लोकांना सांगत होतो घराबाहेर पडू नका आणि स्वतः घराबाहेर कसं पडणार? मी बाहेर पडलो तर गर्दी होते. लोक जमतात. पण तेव्हा गर्दी टाळायची होती. घरात राहून काम करूनही पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये नाव आलं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विश्वासघातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याचा मला फरक पडत नाही. जनतेच्या मनात मी त्यांचा कुटुंब सदस्य आहे. शिवसेनेची हीच ताकद आहे. सामान्यांना असामान्यत्व द्यायचं. राजकारणात ज्या आईने म्हणजेच शिवसेनेने जन्म दिला तिलाच गिळायला निघालेत हे. पण आई सुद्धा आई असते. आपल्या महाराष्ट्रात किती छान निसर्ग आहे. पण त्याची भुरळ यांना पडत नाही गुवाहाटीची भुरळ मात्र लगेच पडते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आणि काही आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला खिंडार पडले. शिवसेनेला लागलेली गळती अजूनही सुरू असून अनेक पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, कार्यकर्ते, नगरसेवक हे एकनाथ शिडणे यांना पाठींबा देत आहेत. तर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पक्ष सावरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.

Exit mobile version