उद्धव ठाकरेंनी बारसूला भेट दिली तिथे त्यांनी या प्रकल्पासाठी बारसूचे नाव आपणच सुचविल्याचा पुनरुच्चार केला पण तत्कालीन शिवसेनेत असलेल्या आणि आज बाहेर पडलेल्या आमदारांनी येऊन आपल्याला ते स्थळ योग्य असल्याचे सांगितले म्हणून आपण त्यावर शिक्कामोर्तब केले असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबतची भूमिका मांडली. लोकांचा विरोध असल्यास प्रकल्पाला विरोधच असेल अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.
“नाणार येथे प्रकल्प होऊ नये ही तिथल्या ग्रामस्थांची मागणी होती. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला. एखाद्या प्रकल्पाला विरोध अथवा समर्थन आम्ही बसल्या जागेवरून करत नाही. मी मुख्यमंत्री झाल्यावर आता जे गद्दार सुपारी घेऊन फिरत आहेत त्यांनी बारसूबद्दल सांगितलं. तिथे लोकांचा विरोध नसल्याचं ते म्हणाले. जमीन निर्मनुष्य आहे शिवाय पर्यावरणाची हानी होणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतरचं मी ते पत्र केंद्र सरकारला पाठवलं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“जमिनीची चाचणी करून केंद्राकडून होकार आल्यास आता आलो आहे तसा तेव्हा येऊन जनतेशी संवाद साधणार होतो. स्थानिकांना प्रकल्पाचे सादरीकरण देणार होतो. त्यानंतर हो की नाही ते ठरवलं असतं. पण, आता केवळ पत्राचे भांडवल केले जात आहे. प्रकल्प चांगला आहे तर इतके पोलीस बारसूमध्ये का आहेत?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
यूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल !
‘द केरळ स्टोरी’ पहिल्याच दिवशी सुपरहिट!
सुरक्षा दलाला यश, बारामुल्लामध्ये दहशतवाद्याचा खात्मा
इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्याला हिंदू धर्मगुरूंची उपस्थिती
“आम्ही आलो तसे त्यांनीही यावे. कोणीही अडवणार नाही. पण, लोक विरोधात असतील तर आमचाही विरोध असेल. इतर वाद नसलेले प्रकल्प गुजरातला दिलेत. राख महाराष्ट्राला आणि रांगोळी गुजरातला असं का?” असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी बारसू प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.