सरकारला घटनाबाह्य म्हणणारे उद्धव ठाकरे अजित पवारांच्या भेटीला

विधानभवनात झालेल्या भेटीमुळे चर्चा

सरकारला घटनाबाह्य म्हणणारे उद्धव ठाकरे अजित पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी बंड करत राज्यात महायुती सरकारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून उद्धव ठाकरे हे बुधवार, १९ जुलै रोजी अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अजित पवारांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाकरे गटातील आमदारांना सोबत घेऊन अजित पवारांना भेटले यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

राज्यातील महायुती सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. घटनाबाह्य सरकार, खोके सरकार, गद्दार सरकार अशी टीका उद्धव ठाकरे सातत्याने करत असतात मात्र, असे असतानाही त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने चर्चा सुरू झाल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी याबद्दल माहिती दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांनी राज्यासाठी चांगले काम करावे, असे सांगितले. तसेच शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच अजित पवारांनी अडीच वर्ष माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावाची मला कल्पना आहे. इथे बाकीच्यांचे सत्तेसाठी काहीही डावपेच चालले असले तरी त्यांच्याकडून जनतेला योग्य मदत मिळेल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या परत एकदा त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

जनतेचा एकच पुकार, देशात पुन्हा मोदी सरकार

जगविख्यात मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन

भागवत कराड घेणार सात कोटींचे घर

आंदोलनकर्त्या विनेशविरोधात युवा कुस्तीगीराची लढाई न्यायालयात

उद्धव ठाकरेंनी विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन भेट घेताना त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तर, अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना स्वत: बसायला खुर्ची दिली.

Exit mobile version