उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान, मुख्यमंत्री, निवडणूक आयोगावर टोमणा अस्त्राचा वापर

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’ला मुलाखत दिली

उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान, मुख्यमंत्री, निवडणूक आयोगावर टोमणा अस्त्राचा वापर

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’ला मुलाखत दिली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणूक आयोग यांच्यावर टोमणे मारत निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका करताना म्हटलं की, “आमचा पक्ष इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. उद्या मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचं नाव बदललं तर? निवडणूक आयोगाने शिवसेनेचं बारसं केलं नव्हतं. कानात येऊन नाव सांगायला निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या लागत नाही. ते नाव माझ्या आजोबांनी दिलंय. ते शिवसेना प्रमुखांनी घेतलं. म्हणून तर त्यांना शिवसेनाप्रमुख म्हणतात,” असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लगावला. कोणीही उठले आणि शिवसेनाप्रमुख व्हायला लागले तर लोक जोड्याने मारतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेने जे कोर्टात मांडलंय ते संविधानाला अनुसरून आहे. संविधानात जे लिहिलं ते पुसून टाकता येत नाही. संविधानाच्या तरतुदीला धरूनच आहे. नाही तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. आता निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. उद्या विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात न्यायालयात जाण्यासाठी दरवाजे उघडे आहेत. आणि तिकडे सर्व सुनावणी झालेली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“अजित पवार अडीच वर्ष माझ्यासोबत होते. त्यांनी अर्थ खातं सांभाळलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यात हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. मग आरोप खरे की अजितदादा खरे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

मणिपूरमधील घटनांवरून उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली. मणिपूरमध्ये शिरलेला चिनी ड्रॅगन गोमूत्र शिंपडल्यावर जाणार आहे का? हे हिंदुत्व नाहीये. देशाचं रक्षण करणं हे हिंदुत्व आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. देशभक्ती, राष्ट्रभक्ती, देशाचं संरक्षण हे माझं हिंदुत्व आहे. त्यांचं हिंदुत्व त्यांनी स्पष्ट करावं. त्यांचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय?, असा सवाल त्यांनी केला.

गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षानंतर एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं. देशभक्त विरोधकांनी तयार केलेल्या इंडिया नावाच्या आघाडीला उत्तर देण्यासाठी पंतप्रधानांना आठवणीतील गोष्टी आठवल्या. त्यासाठी त्यांनी एनडीएतील ३६ पक्षांची बैठक घेतली. खरं तर त्यांना ३६ पक्षांची गरज नाही. त्यांच्यासोबतचे ईडी, इन्कमटॅक्स आणि सीबीआय तीन पक्ष मजबूत आहेत. अनेक पक्षांचा एकही खासदार नाही. आपल्यातले काही गद्दार तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने एनडीएमध्ये तीनच पक्ष शिल्लक राहिलेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

हे ही वाचा :

‘ओपेनहायमर’मधील भगवद्गीता वादानंतर ‘श्रीकृष्ण’ दिग्दर्शकाच्या पाठिशी

ब्रदीनाथ महामार्ग वाहून गेल्याने १००० यात्री अडकले

१२ वर्षांपूर्वीचे प्रकरण: गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी गोपाळ कांडा निर्दोष

कारगिल विजय दिवस; दिवस अभिमानाचा आणि गौरवाचा!

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या चिता पेटलेल्या असताना हे शपथविधी करत होते. संवेदनाच राहिल्या नाही. आता शेवटची आशा राहिली ती जनतेकडूनच. हे देश त्यांचा आहे. अनेक क्रांतीकारकांनी बलिदान देऊन देश उभारला. देश म्हणजे, माणसे आहेत. याच देशाला वाचविण्यासाठी इंडिया ही आघाडी उभी राहिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version