राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर, अर्थसंकल्पावर टीका करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे निरर्थक, अपयश लपवणारं अधिवेशन होतं. हे सरकार स्थापन झालं, तेव्हा १०० दिवसांत काय करणार हा संकल्प केला होता. महायुती सरकारकडून एकही संकल्प पूर्ण करण्यात आला नाही. सरकार सत्तेत आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी हत्या, संतोष देशमुख हत्या, स्वारगेट बलात्कार प्रकरण, रस्ते घोटाळ्यासह अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. कबरीपासून कामरापर्यंतचे हे अधिवेशन होते, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावला. अधिवेशन काळात बोलू दिले असते, तर जनतेसमोर बोलण्याची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून नव्याने दाखल केलेल्या तक्रारीत आणि याचिकेत आमदार आदित्य ठाकरेंचे नाव आरोपी म्हणून आहे. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे दोन वाक्यात प्रतिक्रिया देत हा विषय टोलावून लावला. दिशा सालियन प्रकरणाची काहीही माहिती नाही. त्या विषयाशी संबंध नाही. माहिती नाही त्यावर बोलणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, याबाबत समिती स्थापन करायला हवी. यावरून पेटवापेटवी करण्याआधी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत कोणी पेटून का उठत नाही? नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन झालं. त्याचं काय करायचं. स्मारकावर पाणी सोडलं का? छत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरण करून द्यावं लागतं यापेक्षा दुसरं दुर्देव काय. हे लोक कोरटकर, कोश्यारी आणि सोलापूरकरवर काय कारवाई करणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.
हे ही वाचा:
बलुचिस्तानमधील संघर्ष, परराष्ट्र धोरणावरून इम्रान खान यांनी पाक सरकारला सुनावले
नाशिकमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचे १८१ ‘बांगलादेशी’ लाभार्थी; एफआयआर दाखल
अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वाहनांवर २५ टक्के कर; कोणत्या भारतीय कंपन्यांवर होणार परिणाम?
चेंबूर, गोवंडीमधून १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक
पुढे उद्धव ठाकरेंनी म्हटले की, आम्हाला मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले होते. मुस्लिमांनी मते दिली तर सत्ता जिहाद म्हणतात आणि आता ईदनिमित्त सौगात हे मोदी कार्यक्रम करत आहेत. ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन कार्यकर्ते भेट देणार आहेत. हा सौगात ए मोदी नसून सौगात ए सत्ता आहे. हे बोगस हिंदुत्ववादी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मुस्लिमांच्या नावाने वर्षभर शिमगा करायचा आणि निवडणुका आल्या की पुरणपोळी द्यायची. आता तुमचा पक्ष हिंदुत्ववादी आहे का? सौगात ए सत्ता ही बिहार, उत्तर प्रदेश निवडणुकीपर्यंतच राहणार की अजूनही राहणार. भाजपाने एकदा हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.