पुन्हा आदिलशाही, निजामशाही, मुंबई तोडण्याची भाषा, मर्द, कोथळे आणि ढोकळे

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नेहमीचाच पॅटर्न

पुन्हा आदिलशाही, निजामशाही, मुंबई तोडण्याची भाषा, मर्द, कोथळे आणि ढोकळे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना पुन्हा एकदा नेहमीच्याच शैलीत भाषण केले. त्यात मुंबई तोडण्याची भाषा, आदिलशाही, निजामशाही, मर्द, कोथळे आणि ढोकळे याचा उल्लेख करत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला.

उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्याशीच लढण्याची भाषा केली आहे. गणेशोत्सवादरम्यान अमित शहा हे मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मंत्र दिला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांनाच आव्हान दिले पण ते करताना भाषणाचा तोच पॅटर्न पाहायला मिळाला. ते म्हणाले की, मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यांना मुंबई गिळायची आहे. गिळायला देणार तुम्ही, लचका तोडायला देणार तुम्ही ? आम्हाला जमीन दाखविणाऱ्यांना आम्ही अस्मान दाखवू अशी भाषाही त्यांनी वापरली.

मुंबईत गेल्या अनेक निवडणुकांत स्वतःच्या ताकदीवर यशस्वी ठरलेल्या, वाटचाल करणाऱ्या भाजपाला कमळाबाई म्हणत तुमचा मुंबईशी संबंध काय असा उलटा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

वंशवाद, घराणेशाहीचे समर्थनही त्यांनी केले. त्याचा संबंध त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी जोडत आमचे कुटुंब या चळवळीतील अग्रणी होते असे सांगत अशा कुटुंबाच्याच पाठीशी शिवसैनिकांनी राहावे अशी साद घातली. २५ वर्षे राजकीय आयुष्यातील युतीत कुजली, सडली याचा पुनरुच्चार त्यांनी केले. महाराष्ट्रात गेल्या दोन निवडणुकांत शंभरपेक्षा अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाला उद्धव म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष असलात तरी कर्तृत्व काय होतं तुमचं. मला अभिमान आहे संयुक्त चळवळीत काका, वडील मराठी माणसासाठी लढत होते. ही आमची परंपरा आहे. मी आहे, आदित्य आहे. वंशवादावर टीका करणार असाल तर तुमचा वंश कोणता? असा प्रश्न विचारत आपल्या घराणेशाहीवरील टीकेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

राजू तू निखळ आनंद दिलास! अलविदा

हा ब्रिटनला इशारा आहे

मुंबई विमानतळाने कोरोनानंतर हाताळले विक्रमी १ लाख ३० हजार प्रवासी

काँग्रेस अध्यक्ष होण्यास अशोक गेहलोत राजी

 

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबई तोडण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती दाखविली. ते म्हणाले की, मुंबई केवळ जमीन आहे त्यांच्यासाठी. आर्थिक केंद्र गुजरातला पळवले आहे. माझी योजना होती धारावीत आर्थिक केंद्राची ते आर्थिक केंद्र करून दाखवणारच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या दिरंगाईमुळेच वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला अशी भाषा करणाऱ्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्यामुळे प्रकल्प गेला तुमच्यामुळे गेला हे सोडून पुन्हा वेदांत आणूया, असे सबुरीचे धोरण स्वीकारले.

उद्धव यांनी निवडणुका लक्षात घेत मुस्लिमांना, गुजराती समाजाला साद घातली. ते म्हणाले की, मुस्लिम लोकही शिवसेनेसोबत आहेत. हिंदूंमध्ये मराठी अमराठी भेदभाव केलात अमराठीही आहेत. गुजरात उत्तर प्रदेशचेही आहेत. ९२-९३मध्ये देशद्रोह्यांनी थैमान घातले होते तेव्हा शिवसैनिकांनी दर्ग्याचे रक्षण केले आहे. हे सगळे मते मिळविण्यासाठी नाही. सगळे मुस्लिम गद्दार आहेत असे बाळासाहेबांनी कधीही म्हटले नव्हते. म्हणून ते आमच्यासोबत आहेत. आगामी निवडणुका लावून दाखवा अशी मागणीही त्यांनी केली.

संजय राऊत यांची खुर्ची

संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची मंचावर ठेवण्यात आली होती. त्यावरून चर्चा रंगली होती. त्याबद्दल उद्धव म्हणाले, मंचावर रिकामी खुर्ची पाहिली संजय राऊतांची. संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढत आहेत. सोबत आहेत तलवार हातात घेऊन आघाडीवर आहेत.

Exit mobile version