उद्धव ठाकरे गटाचा मुंबईत होणार सुपडा साफ

एबीपी माझा-सी व्होटरचा निवडणूक पूर्व अंदाज

उद्धव ठाकरे गटाचा मुंबईत होणार सुपडा साफ

 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला आहे. उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. सगळे उमेदवार जय्यत तयारी करत आहेत. अशात एबीपी माझा सी व्होटरचे सर्वेक्षण समोर आले असून त्यात मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाला एकूण ९ जागा जिंकता येतील तर शरदचंद्र पवार गटाला ५ जागांवर यश मिळेल, तर काँग्रेसच्या खात्यात ३ जागाच येतील, असे या सर्वेक्षणात अंदाज नोंदविण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टी सर्वाधिक यशस्वी पक्ष असेल आणि त्यांना २१-२२ जागा जिंकता येणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ९ ते १० जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे एकूण महायुतीला ३० तर महाविकास आघाडीला १८ जागा मिळतील असे हा अंदाज म्हणतो.

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीला ४८ जागा जिंकता येतील असा अंदाज व्यक्त केला होता पण त्यांना ३० जागा कमी मिळतील असे हे सर्वेक्षण सांगत आहे.

अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीच्या जागेवर नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अर्थात, तीनवेळा या भागातून खासदार झालेल्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही लढत सोपी राहिलेली नाही. कारण अजित पवार यांचीही बारामतीत मोठी ताकद आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवत आहेत. तेव्हा सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही लढत सोपी नसेल.

मुंबईत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई व वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर पराभूत होतील असे हा अंदाज म्हणतो.

महायुतीने ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ४ जूनला महायुतीच्या पारड्यात मतदार किती जागा टाकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

Exit mobile version