हिंदुत्ववादी मते फुटू नयेत म्हणून उबाठा गटाच्या उमेदवाराने घेतली माघार

किशनचंद तनवाणी यांनी निवडणूक न लढविण्याचा घेतला निर्णय

हिंदुत्ववादी मते फुटू नयेत म्हणून उबाठा गटाच्या उमेदवाराने घेतली माघार

संभाजीनगर मध्य भागातून उद्धव ठाकरे यांच्याकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण २९ ऑक्टोबरला अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असताना त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णय़ामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. आता त्याजागी नवा उमेदवार कोण निवडला जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यासंदर्भात उमेदवारी मागे घेणारे किशनचंद तनवाणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, २०१४मध्ये इथे जे घडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. त्यावेळी भाजपाकडून आपण उमेदवार होतो आणि शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल उमेदवार होते. शिवाय एमआयएमचे इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण तेव्हा दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या मतांमध्ये फूट पडल्याने जलील निवडून आले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण उमेदवारी मागे घेत आहोत.

२०१४मध्ये जैस्वाल यांना ४१ हजार मते पडली होती आणि ते पराभूत झाले होते. पण २०१९मध्ये ते पुन्हा निवडून आले. तेव्हा भाजपा-शिवसेना युती होती. त्यावेळी तनवाणी हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यामुळे जैस्वाल यांच्या रूपात एकमेव उमेदवार असल्याने मतांत फाटाफूट झाली नाही आणि जैस्वाल विजयी झाले. तेव्हा त्यांना ८० हजारापेक्षा अधिक मते पडली होती. पुढे जैस्वाल यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचे ठरविले. त्यावेळी तनवाणी हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आले. मात्र आता पुन्हा दोन्ही हिंदुत्ववादी उमेदवार समोरासमोर आल्यामुळे नासिर सिद्दीकी या एमआयएमच्या उमेदवाराला फायदा होईल, या विचारातून तनवाणी यांनी माघार घेतली.

हे ही वाचा:

मविआत आता टायपिंग मिस्टेकवरून कलह

MUDA मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कर्नाटकमध्ये सहापेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी

बोरिवलीतून संजय उपाध्याय, वसईतून स्नेहा दुबे, तर सावनेरमधून आशिष देशमुख!

बिश्नोईला आव्हान देणारा पप्पू यादव थरथर कापू लागला!

आता उबाठा गट आपला उमेदवार देणार असेल तर पुन्हा मतांची विभागणी होईल का, त्याचा फायदा एमआयएमच्या उमेदवाराला होईल का या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल.दुसरीकडे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जलील यांची भेट घेतली होती. त्यांनी आता मराठा, दलित आणि मुस्लिम असे समीकरण तयार करण्याचे सुतोवाच केले आहे. शिवाय, ते सत्ताधारी पक्षातील उमेदवार पाडण्याची भाषा करत असल्यामुळे हे समीकरण त्यांनी संभाजीनगरात जुळवले तर त्याचा फटका शिंदे गटाच्या उमेदवाराला बसेल का, याचाही आता विचार होईल.

 

Exit mobile version