महाराष्ट्रातील महायुती सरकारने आता लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना मासिक १५०० रुपये दिले जाणार आहेत. या घोषणेमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही योजना कशी फसवी आहे, ही फक्त निवडणुकीच्या आधी तीन महिन्यांसाठी आहे असा प्रचार विरोधकांनी सुरू केला आहे.
ठाण्यात झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत तर त्यांनी महाराष्ट्रातील महिलांना आवाहन केले की, १५०० रुपयांना विकले जाऊ नका. उद्धव ठाकरे यांचे हे आवाहन भीतीतून आलेले आहे का? कारण ही योजना जाहीर झाल्यानंतर त्या योजनेसाठी महिलांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतो आहे. दिलेल्या निकषांत बसणाऱ्या महिलांचे अनेक अर्ज आलेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत महिलांचे मतदान महायुतीला होईल आणि आपल्याला त्याचा फटका बसेल अशी शंका विरोधकांच्या मनात येत असली पाहिजे. त्यातून मग विविध शंका उपस्थित करून या योजनेवर टीका केली जात आहे.
ही टीका व्हायलाही हरकत नाही. या योजनेतील त्रुटी, दोष विरोधकांनी दाखविल्या तर त्यात वावगे काहीही नाही. पण ठाण्यात झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत महिलांनी ही योजना स्वीकारून स्वतःला विकू नये, असे म्हणणे म्हणजे महिलांचा अपमानच आहे. महाराष्ट्रातील महिला मूर्ख आहेत किंवा अडाणी आहेत की त्यांना या दीड हजार रुपयांच्या योजनेबाबत काहीही माहित नाही. सरकारने नक्कीच जनतेचा आपल्यावर विश्वास कायम राहावा यासाठी ही योजना आणली आहे. आपण लोकांसाठी काहीतरी करतो आहोत, ही भावना त्यामागे आहे आणि ही प्रत्येक सरकारची भावना असते. त्यामुळे दीड हजार रुपयांची घोषणा ही अनेक महिलांना दिलासा देणारी ठरू शकते. त्यात विरोधकांना त्रास होण्याचे कारण नाही.
जर विरोधकांचे म्हणणे असेल की, अशी योजना आणून तुम्ही महाराष्ट्रावरील बोजा वाढवत आहात तर ते म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र त्यांनीही लोकसभा निवडणुकीतील प्रचारात देशातील प्रत्येक महिलेच्या खात्यात निवडणुकीनंतर ८५०० रुपये जमा होतील असे आश्वासन दिले होते. इंडी आघाडीचे नेते राहुल गांधी यांनी तर ८५०० रुपये तुमच्या खात्यात खटाखट खटाखट जमा होतील असे म्हटले होते. मग याचा अर्थ ८५०० रुपयांत मतदारांना विकत घेतले जाणार होते का? भाजपाने या आश्वासनावर टीका केली होती. कारण एक लाख रुपये जर प्रत्येक वर्षी दिले जाणार असतील एकेका महिलेला तर देशाच्या खजिन्यावर किती बोजा पडेल असा सवाल विचारण्यात आला होता. पण तेव्हा कुणीही महिलांनो ८५०० रुपयांसाठी स्वतःला विकू नका, असे म्हटले नव्हते.
उद्धव ठाकरे यांनी ती भाषा वापरून महिलांना एकप्रकारे अपमानितच केले आहे. जर उद्या महाविकास आघाडीचे सरकार आले तर ते ही योजना रद्द करतील का, रद्द करून नवी योजना आणतील का? याबाबत त्यांनी सांगायला हरकत नाही. पण लाडकी बहीण योजना आपण रद्द करू असे उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीतील कुणीही नेते म्हणणार नाहीत. कारण त्याचे परिणाम त्यांना माहीत आहेत.
हे ही वाचा:
‘माझ्या नादाला लागू नका’, माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे कळणार नाही !
माध्यमांनो, खऱ्या बातम्या द्या, नाहीतर टाळे लावू!
शेख हसिना म्हणाल्या, अमेरिकेनेच आपल्याला सत्तेवरून हटवले
बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या आत्याचाराविरोधात सांगलीत निषेध सभा
उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असे म्हणत असतात. ते कर्ज माफ करताना मते विकत घेतली गेली असा आरोप करता येऊ शकतो. पण तेव्हा कर्जमाफी स्वीकारून स्वतःला विकू नका, असे कुणीही म्हटले नव्हते. किंबहुना, मुस्लिम मतांची बेगमी करताना उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांबद्दल नेहमीच बोटचेपी आणि लांगुलचालनाची भूमिका घेतली. त्यामुळेच त्यांना लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मते मोठ्या प्रमाणावर मिळाली. अगदी मुस्लिमांनी फतवे काढून महाविकास आघाडीतील कोणत्या उमेदवारांना मते द्यायची हे निश्चित केले होते. मग तेव्हा स्वतःची मते विकू नका, असा सल्ला त्यांना कुणी दिला नाही. आपल्याला मते हवी असतील तर कोणतीही आश्वासने द्यायची पण समोरच्या पक्षाने आश्वासने दिली तर ती विकत घेण्यासाठी असतात, अशी दुटप्पी भूमिका कशाला?
तेव्हा तर काँग्रेसने ८५०० रुपये देण्याची घोषणा करताना महिलांकडून अर्जही भरून घेतले. त्यानुसार त्यांनी काँग्रेसला मतदान केलेले असले पाहिजे. पण काँग्रेसचे सरकार आले नाही आणि त्या पैशांचे काय झाले अशी विचारणा होऊ लागली. मग सरकार येण्याच्या आधीच असे अर्ज भरून घेऊन एकप्रकारे मतांची बेगमीच इंडी आघाडीने केली नाही का? महाराष्ट्रात मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच आहे. त्यांना अशी योजना जाहीर करण्याचा अधिकारही आहे. ही योजना रद्द करा म्हणून न्यायालयातही धाव घेतली गेली पण ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे अशा योजनेवर योग्य पद्धतीने टीका करायला हरकत नाही. पण १५०० रुपयांसाठी स्वतःला विकू नका, ही अपमान करणारी भूमिका मात्र योग्य नाही