उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांची पुण्यात भेट

उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांची पुण्यात भेट

राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतिक्षीत असलेली खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट झाली. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाबाबत एकमत असल्याचं सांगितलं. राज्यकर्त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी एकत्र येऊन समाजाचा प्रश्न मार्गी लावावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांनी केलं.

या भेटीसाठी दोन्ही राजे कालच पुण्यात दाखल झाले होते. मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांनी सर्व राजकीय नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच या दोघांची भेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी बऱ्याच उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आज अचानकपणे संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या भेटीची माहिती समोर आली आहे.

सध्या संभाजीराजे छत्रपती राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा आहेत. त्यांनी १६ जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. उदयनराजे भोसले हे संभाजीराजेंच्या पाठिशी उभे राहणार का, हेदेखील पाहावे लागेल.

गेल्या काही दिवसांमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभरात फिरून अनेक अभ्यासक, तज्ज्ञ आणि प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतरही मराठा आरक्षणाचे गाडे फारसे पुढे सरकलेले नाही. त्यामुळे आता संभाजीराजे आणि उदयनराजे हे दोन राजे एकत्र येऊन सरकारवरील दबाव वाढवू शकतात, अशी शक्यता बोलून दाखविली जात आहे. मात्र, उदयनराजे भोसले नेमकी काय भूमिका घेतात यावर पुढल्या गोष्टी निश्चित होणार आहेत.

हे ही वाचा:

चिराग पासवान यांना मोठा धक्का

१२ वर्षानंतर नेतान्याहू सत्तेतून बाहेर

उल्हासनगर प्रकरणी बिल्डरवर महिन्याभराने गुन्हा 

विधानसभा निवडणूकही काँग्रेसने स्वबळावर लढवावी

गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आणखी एक भव्य मोर्चा काढण्याची तयारी सध्या सुरु आहे. यासाठी छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा सुरु आहे. या तिघांच्या वेळा घेतल्यानंतर मोर्चाची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र आल्यास या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version