शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही पुढारी राजकारण करत आहेत. आम्ही बारसू येथील शेतकऱ्यांशी चर्चा करत आहोत. प्रशासनाला त्यात यशही येत आहे. पण काही लोकांना ते बघवत नसल्यामुळे ते शेतकऱ्यांची माथी भडकावत आहेत, असा आरोप मंत्री उदय सामंत यांनी केला.
बारसू येथे रिफायनरी उभारण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर तिथे आंदोलन सुरू झाले आहे. त्या आंदोलनाला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांचा पाठिंबा आहे. संजय राऊत, विनायक राऊत यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यावरच सामंत यांनी निशाणा साधला.
उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बारसू येथील शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केलेली आहे. आधीपासूनच शेतकऱ्यांशी आमच्या चर्चा सुरू होती. आम्ही अजूनही शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहोत. भविष्यातही तयार असू. पण ते काही लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
उदय सामंत यांनी विश्वास व्यक्त केला की, शेतकऱ्यांना डावलून कुठेही प्रकल्प पुढे जाणार नाही. शेतकऱ्यांच्या सगळ्या शंकांचे निरसन केले जाईल. पण जे लोक शेतकऱ्यांची डोकी भडकाविण्याचे काम करत आहेत, त्यांनी ते काम थांबवावं.
हे ही वाचा:
एअर इंडियात होणार एक हजार वैमानिकांची भरती
महाराष्ट्रदिनी माविआची असेल शेवटची वज्रमूठ
२ कोटी लोकांना एफएम सुरांची भेट
रामलला २२ जानेवारीला गाभाऱ्यात होणार विराजमान !
सामंत म्हणाले की, शेतकऱ्यांना पुढे करून राजकारण केले जात आहे, ते घातक आहे. विनायक राऊत यांना आमची विनंती आहे की, त्यांना शंका असतील तर त्यादेखील प्रशासनाच्या माध्यमातून दूर करू. ते तिथे गेले म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले. आंदोलकांच्या हाती शिवबंधन दिसले. त्यांनी तिथे लोक आणून आंदोलन केले आहे. मुख्यमंत्र्यांना आंदोलकांची भेट घ्यायची आहे, त्याचीही व्यवस्था केली जाईल.
सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्राची आठवण करून दिली. तेव्हा १२ जानेवारी २०२२ला ग्रामस्थांच्या विरोधात पत्र दिले होते. तेव्हा विचार केला नाही. आता आंदोलनात सोबत आहेत.