नवाब मलिकांच्या जामीनात दोन आठवड्यांची मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाकडून वैद्यकीय जामीनाची मुदत वाढवली

नवाब मलिकांच्या जामीनात दोन आठवड्यांची मुदतवाढ

मनी लाँड्रिंग प्रकरणी जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अंतरिम वैद्यकीय जामीनाची मुदत दोन आठवड्यांनी वाढवली आहे.

नवाब मलिक यांच्या जामीनाचा शुक्रवार, १२ जुलै हा शेवटचा दिवस होता. जामिनात आणखी मुदतवाढ मिळावी, यासाठी नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड मालमत्ता खरेदी प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये काही अटीशर्तींवर ते अंतरिम जामीनावर बाहेर आले होते. सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी प्रकृतीच्या कारणास्तव मलिक यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर कुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामिनाची मागणी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला मंजुरी दिली होती.

हे ही वाचा:

केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर पण मुक्काम तुरुंगातच!

राहुल गांधी यांचे अग्निवीरबाबतचे आरोप बिनबुडाचे असल्याचे माजी अधिकाऱ्याने केले स्पष्ट

विधान परिषदेचे मतदान सुरू; कोण मारणार बाजी?

नेपाळमध्ये भूस्खलन होऊन प्रवाशांनी भरलेल्या दोन बस गेल्या नदीत वाहून

प्रकरण काय?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिकांवर आरोप आहेत. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने कारवाई करत मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिमचे सहकारी हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांच्यासह नवाब मलिक यांनी मुनिरा प्लंबरची मुंबईतील कुर्ला येथील वडिलोपार्जित मालमत्ता हडपण्याचा गुन्हेगारी कट रचला, असा ईडीचा आरोप आहे. या वडिलोपार्जित मालमत्तेची किंमत सुमारे तीनशे कोटी रुपये आहे. हा गुन्हा मनी लाँड्रिंगमधून झाल्याचा दावा ईडीने केला आहे.

Exit mobile version