भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नवी मुंबई येथील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मागणीस विरोध केला आहे. ही मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली होती.
दोन्ही पक्षांनी या विमानतळाला दिनकर बाळू पाटील यांचे नाव देण्यात यावे असे सुचवले होते. दिनकर बाळू पाटील हे डीबी पाटील या नावाने अधिक लोकप्रिय आहेत. पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मते, नवी मुंबईच्या विमानतळाला डी.बी.पाटील यांचे नाव दिले पाहिजे, कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले होते.
“जेव्हा सिडकोने विविध बांधकामांसाठी शेतकऱ्यांकडून भूमी अधिग्रहणाला सुरूवात केली, तेव्हा पाटील यांनी मोठे शेतकरी आंदोलन सुरू केले. १९८४ मध्ये झालेल्या आंदोलनात चार शेतकऱ्यांनी आपला जीवही गमावला होता. या आंदोलनानंतर सिडकोच्या १२.५ टक्क्यांच फॉर्म्युला आणला गेला आणि पुढे तो देशभरातही लागू झाला. जेव्हा जे.एन.पी.टीने भूमी अधिग्रहण केले तेव्हाही त्यांनी अशाच प्रकारे शेतकऱ्यांचा मोठा विरोध घडवून आणला होता. स्वतः आजारी असूनही त्यांनी शेतकरी आंदोलनाला दिशा दिली होती.” असेही प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
मनसे नेते गजानन काळे यांच्या मते, जर शिंदे यांनी स्थानिकांचे मत विचारात घेतले असते तर त्यांना बहुसंख्यांनी त्यांनी डी.बी.पाटील यांचेच नाव सुचवले असते. “आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नवी मुंबई विमानतळाला पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.”
एक आठवड्यापूर्वीच शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, नवी मुंबईच्या विमानतळास शिवसेना संस्थापकांचे नाव देण्याची विनंती केली होती.