लोकसभा निवडणुक अगदी काही दिवसांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाची चांगलीच कोंडी झाली आहे. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला कर वसुलीची नोटीस बजावली आहे. आयकर विभागाने काँग्रेसला १७०० कोटींची नोटीस पाठवली आहे. यात दंड आणि व्याज दोन्हीचा समावेश असल्याची माहिती आहे. अशातच काँग्रेसच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवार, २९ मार्च रोजी रात्री आयकर विभागाकडून काँग्रेसला आणखी दोन नोटीस मिळाल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी याबाबत माहिती दिली आहे. म्हणाले की, काल रात्री आम्हाला आणखी दोन नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शुक्रवारी सांगितले की, पक्षाला आयकर विभागाकडून नवीन नोटीस मिळाल्या आहेत. ज्यात सुमारे १ हजार ८२३ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. २०१७-१८ आणि २०२०-२१ या मूल्यांकन वर्षांसाठी नोटीस बजावण्यात आली होती आणि त्यात दंड आणि व्याजाचा समावेश होता. गुरुवारी, दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या याचिका फेटाळून लावल्या ज्यात कर अधिकाऱ्यांनी चार वर्षांच्या कालावधीसाठी कर पुनर्मूल्यांकनाची कार्यवाही सुरू केली होती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि पुरूषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने सांगितले की, या याचिका फेटाळून लावण्यात आलेल्या याआधीच्या निर्णयाच्या संदर्भात फेरमूल्यांकन आणखी एक वर्ष सुरू करण्यात हस्तक्षेप करण्यास नकार देण्यात आला. मागील आठवड्यात फेटाळण्यात आलेल्या याआधीच्या याचिकेत, काँग्रेस पक्षाने २०१४-१५ ते २०१६-१७ या मूल्यांकन वर्षांशी संबंधित पुनर्मूल्यांकन कार्यवाही सुरू करण्याला आव्हान दिले होते.
हे ही वाचा:
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद मिटला
व्याभिचारी महिलेला सार्वजनिकरीत्या दगडाने ठेचून मारणार
भारतीय नौदलाचा पुन्हा चाच्यांशी संघर्ष; अपहृत जहाजावरील २३ पाक कर्मचाऱ्यांची सुटका
बेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर
प्राप्तिकर विभागाने २०१७ ते २०२१ या चार वर्षांच्या काळातील काँग्रेसच्या बँक व्यवहाराची तपासणी सुरू केली आहे. त्याविरोधात पक्षाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्याआधी २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीतील तपासणी करून पक्षाला वसुलीची नोटीस पाठवली होती. त्यानंतर पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली. त्यावेळी सुमारे दीडशे कोटींची वसुलीही करण्यात आली होती. आता तब्बल १ हजार ७०० कोटींची नोटीस पाठवण्यात आल्याने काँग्रेससमोर अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तसेच पक्षाच्या इतर कामांसाठी पैसे नसल्याचा दावा केला होता.