सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत जवळपास ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन बंड पुकारले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या शिवसेना आमदारांना भावनिक साद घातली. मात्र, त्यानंतर शिवसेनेचे पुन्हा दोन आमदार फुटल्याचं समोर आलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी काल, २२ जून रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधल्यावर शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांचे फोन नॉट रिचेबल आले होते. दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर आणि कुर्ला मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर हे गुवाहटीला रवाना झाल्याची माहिती आहे.
यासंदर्भातील माहिती मंगेश कुडाळकर यांनी दिली आहे. “आज सकाळपर्यंत माझा विचार नव्हता पण काही कारणांमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे,” असं ते म्हणाले आहेत. या दोन आमदारांच्या निर्णयामुळे शिनसेनेला मोठा धक्का बसला असून आता शिवसेनेला मोठं भगदाड पडत असल्याचं चित्र आहे.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेचे ट्विट; शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू नव्हे भरत गोगावले
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या धक्क्यात २५५ लोकांचा मृत्यू
संजय राऊत यांनी सांगितले, सरकारचा कारभार आटोपला
‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’
शिवसेनेने विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची निवड केली त्यावेळी हे दोन्ही आमदार उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेच्या निकालानंतर बंडखोरी करत शिवसेनेच्या आमदारांना घेऊन पक्षाविरोधात बंड पुकारलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे. आता राज्यातील राजकारणात काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.