ट्विटर ने काँग्रेस पक्षाशी संबंधित महाराष्ट्रातील काही ट्विटर हँडल्स लॉक केली आहेत. मुंबई काँग्रेसच्या ट्विटर खात्याचा समावेश आहे. तर त्यासोबतच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या ट्विटर खात्यांचा देखील समावेश आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अकाउंट ब्लॉक केल्यानंतर आता इतर काँग्रेस नेत्यांवर ही कारवाई होताना दिसत आहे.
दिल्ली येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेबद्दल ट्विटरवर व्यक्त होताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडितेची ओळख खुली होईल अशाप्रकारे ट्विट केले होते. त्याच्यावर जनतेने आक्षेप घेतला असून त्यांच्या असंवेदनशीलतेवर टीका केली होती. त्याचवेळी त्यांच्या ट्विटवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यानुसारच ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटने राहुल गांधींचे ट्विट हटवले होते. तर त्यानंतर राहुल गांधी यांचे खाते अस्थायी स्वरूपात लॉक करण्यात आले.
हे ही वाचा:
शिक्षणसम्राट मंत्र्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी टेकले गुडघे
संजय राठोड करतो लैंगिक छळ…यवतमाळ पोलिसांना पीडित महिलेचे पत्र
राज्यसभेत काँग्रेस खासदारांचे प्रगल्भ, लोकशाहीवादी वर्तन
फी कपातीच्या विषयात ठाकरे सरकारची पळवाट, अध्यादेश ऐवजी शासकीय आदेश
राहुल गांधींसोबतच मुंबई काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देखील अशाच प्रकारचे ट्विट करण्यात आले होते. त्यामुळेच त्या खात्यावर देखील कारवाईचा बडगा उगारला गेला. तर त्या सोबतच काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची खातीही लॉक केली गेली आहेत. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप यांच्या खात्यांचा समावेश आहे. राहुल गांधींवर करण्यात आलेल्या कारवाईचा विरोध करताना काँग्रेतर्फे सध्या मैं भी राहुल गांधी असे एक कॅम्पेन चालवले जात आहे.