महाराष्ट्र सरकारच्या आपसातील धुसपूसीचा सिलसिला दिवसागणिक सुरूच आहे. औरंगाबाद नामांतराचा प्रश्न हा त्यासाठी नवा मुद्दा ठरला आहे. एकीकडे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी काँग्रेसविरोधात ‘रोखठोक’ भाष्य केले आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच ‘ट्रेंडिंग’ असताना काँग्रेस आणि शिवसेनेत या मुद्द्यावरून जुंपली आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’ या सदरातून काँग्रेस पक्षावर थेट भाष्य केले आहे. “काँग्रेससारखे सेक्युलर पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्यांक नाराज होतील आणि मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजेच सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.” असे म्हणत काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेस आक्रमक
राऊतांच्या या लेखाविरोधात बाळासाहेब थोरात यांनीही जोरदार हल्ला चढवला आहे. ‘नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत?’ असे ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. थोरात यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात “शिवसेनेला आपल्या मतांची चिंता आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरु केला आहे.” असा टोला थोरातांनी लगावला आहे. पण याच पत्रकात “महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये.” असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला आहे.
नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत? pic.twitter.com/Zvd437Ufym
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 17, 2021
दुसरीकडे काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊत तुमच्या लेखात महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅममधील मुद्द्यांवर भाष्य केले नाहीये. महाविकास आघाडी ‘सेक्युलॅरिजम’ च्या तत्वाशी कटिबद्ध आहे” असे म्हणताना “काँग्रेसला कोणीही ‘सेक्युलॅरिजम’ शिकवण्याची गरज नाही. आपली मते वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून याचा खुलासा झाल्यावर बोलता येईल” अशी आक्रमक भूमिका यशोमती ठाकूर यांनी मांडली आहे.
आम्ही काँग्रेस म्हणून मविआच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये असलेल्या विषयांवर काम करण्यास कटिबद्ध आहो.काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही आपली मतं वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून याचा खुलासा झाल्यावर बोलता येईल
@RahulGandhi @kcvenugopalmp @HKPatil1953 @ShivSena @rautsanjay61— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 17, 2021
भाजपाचे टीकास्त्र
काँग्रेस-शिवसेनेच्या या कलगीतुऱ्यावर भारतीय जनता पार्टीने टीका केली आहे. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी दोन्ही पक्षांवर तोफ डागली असून, “औरंगाबाद वरून सत्ताधारी पक्षात सुरू असलेली साठमारी केवळ धूळफेक आहे. सत्तेचे लोणी सर्व जण एकत्र येऊन व्यवस्थित ओरपतात.” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
औरंगाबाद वरून सत्ताधारी पक्षात सुरू असलेली साठमारी केवळ धूळफेक आहे. सत्तेचे लोणी सर्व जण एकत्र येऊन व्यवस्थित ओरपतात.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 17, 2021