संजय राऊतांना का झोंबला ‘सय्यद फंडा‘?

संजय राऊतांना का झोंबला ‘सय्यद फंडा‘?

शिवसेना नेते संजय राऊतांनी शांततेचा पवित्रा घ्यावा, असे आता दीपाली सय्यद यांनाही वाटते. म्हणजे मी तर बोलणार, तुम्ही मात्र शांत व्हा, असा काहीसा सय्यदबाईंचा सूर आहे.

ज्यांनी शिवसेनेत हयात काढली, पण आज जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत, अशा अनेक आमदारांनी गेल्या काही दिवसांत संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. शिवसेनेतील अंतर्गत फुटीचा ठपका राऊतांवर ठेवला आहे. दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, ‘काय झाडी, काय डोंगार…’ फेम शहाजी बापू पाटील अशी अनेक नावे सांगता येतील. विजय शिवतारे हे त्यातले अगदी ताजे नाव. शिवसेनेतून शिवतारे यांची हकालपट्टी झाल्यानंतर संजय राऊतांना त्यांनी थेट स्क्रीझोफेनिक ठरवून टाकले आहे. पण राऊतांनी तेही सहन केले असते, पण आता दीपाली सय्यद यांनी बोलावे हे मात्र त्यांना अगदी झोंबले असावे.

संजय राऊत यांची एक स्टाईल आहे, पण कालपर्यंत ते भाजपाच्या विरोधात बोलत होते, पण आता मामला शिवसेनेता अंतर्गत आहे, त्यामुळे संजय राऊत यांनी आता शांततेचा पवित्रा घ्यायला हवा, असा फंडा सय्यद बाई यांनी मांडला आहे.
गेली काही वर्षे ज्यांना फक्त बोलण्याची सवय आहे, अशा राऊतांना कालपरवा पक्षाचा झेंडा घेणाऱ्या सय्यद बाईंचे बोल भारीच झोंबले असणार. त्यांनी ‘तुमचा पगार किती? बोलताय किती?’ असा भाव आणत बाईंची पिसं काढली. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे येत्या दोन दिवसात एकत्र भेटतील’, हा सय्यद बाईंचा दावा राऊतांनी एका दमात धुडकावून लावला. दीपाली सय्यद या अभिनेत्री आहेत, त्या पक्षाच्या प्रवक्त्या नाहीत की शिवसेना नेत्या नाहीत, त्यांना हे अधिकार कुणी दिले? असा सवाल राऊतांनी विचारला.

या सय्यदबाई शिवसेनेत एक दिवस अचानक उगवल्या. शिवसेनेच्या रणरागिणी बनल्या. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोलू लागल्या. तेव्हाही त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या नव्हत्या कि शिवसेना नेत्या नव्हत्या. राऊतांच्या म्हणण्यानुसार फक्त अभिनेत्री किंवा पदाधिकारी होत्या. तेव्हा अधिकार नसताना त्यांनी केलेली बकबक ऐकून शिवसेना नेत्यांना गुदगुल्या होत होत्या. पण बाईंनी राऊतांना गप्प राहण्याचा सूचक ईशारा केल्यानंतर राऊतांना त्या प्रवक्त्या किंवा शिवसेना नेत्या नसल्याची आठवण झाली. म्हणजे मोदी आणि राज ठाकरे यांच्याबाबत वाट्टेल ते बरळताना तुमच्याकडे काही योग्यता नसली, अधिकार नसला तरी चालेल परंतु राऊतांना सल्ला देताना मात्र योग्यता अनिवार्य बनली.
अज्ञान ही सुद्धा मोठी ताकद आहे, असा माणूस कुणालाही काहीही बोलू शकतो. सय्यद बाईंकडेही ही ताकद आहे, त्यामुळे त्या राऊतांच्या विरोधात बोलण्याचे धाडस करू शकल्या. त्यांना शांत राहण्याचा सल्ला देऊ शकल्या. चुकून माकून त्या खरं बोलून गेल्या.

राऊत बराच काळ सातत्याने बोलतायत. न थकता बोलतायत. शोले सिनेमातली बसंती टांगेवाली सुद्धा एवढं बोलली नसेल.
गोवा निवडणुकांच्या काळात ते म्हणाले, गोव्यात शिवसेनेचा माहोल आहे, आम्ही गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवणार आहोत. गोव्यात त्यांना नोटापेक्षा कमी मते पडली. उत्तर प्रदेशात शिवसेनेने उमेदवार उतरवले तिथेही मार पडला. शिवसेनेचे सूर्ययान दिल्लीत लॅंड केल्यास आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्हणाले. तूर्तास महाराष्ट्रात त्यांनी सत्ता आणि पक्ष गमावला आहे.

महाराष्ट्रात अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार आणले याच एका अर्ध्यामुर्ध्या यशावर लोक त्यांचे किती आणि काय काय ऐकणार. एका पिसाने मोर बनत नाही, पिसाने पिसारा फुलावा तरी कसा?

हे ही वाचा:

सेबीचे ईमेल अकाउंट हॅक, हॅकरकडून पाठविण्यात आले अनेकांना मेल

पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेला घातला गंडा!

लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते राहुल शेवाळे?

साकिनाक्यात सापडला इसमाचा कुजलेला मृतदेह, पत्नीचा शोध सुरू

 

विजय शिवतारे यांनी राऊतांच्या वल्गनांचा हा पाढाच वाचला आहे. थोडक्यात, बोलून राऊत थकले नसले तरी ऐकून लोक थकले आहेत. शिवसेनेने सत्ता गमावल्यानंतर राऊतांची घासलेली कॅसेट ऐकण्यात कुणालाच रस उरलेला नाही. पण दीपाली सय्यद देखील या रांगेत उभ्या झाल्याचे राऊतांना विशेष दु:ख झाले असावे, त्यामुळे आजवर एकाही नेत्याच्या टिप्पणीवर व्यक्त न झालेले राऊत सय्यद बाईंना मात्र त्यांची योग्यता सांगून गेले.

‘कोणताही झेंडा घेऊ हाती…?’ असा प्रश्न ज्यांना स्वत:ला पडलाय, त्या सय्यदबाईं अजून तरी उद्धव सेना सोडून वेगळ्या झालेल्या नाहीत. राऊतांनी किमान त्यांचे तरी ऐकतील? काही दिवस शांत राहतील? की थेट मातोश्रीवरून आदेश येईपर्यंत अ’शांत’च राहतील?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version