उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी काल राजीनामा दिल्यावर आज नवे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंग रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीरथ सिंग रावत हे भाजपाचे खासदार आहेत. २०१३-१५ या काळात ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंडच्या गढवाल लोकसभा क्षेत्रातून ते खासदार म्हणून निवडून गेले आहेत.
उत्तराखंडमध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले होते. उत्तराखंड विधानसभेच्या ७० पैकी ५७ जागांवर भाजपाला विजय मिळाला होता. तत्कालीन सत्ताधारी पक्षाला निवडणुकांनंतर केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले होते. चर्चेत नसलेल्या नावाची निवड मुख्यमंत्री पदासाठी करण्यात आली, जी २०१४ नंतरच्या भाजपाची शैली राहिली आहे. त्यामुळे त्रिवेंद्र सिंग रावत हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनले.
हे ही वाचा:
परंतु कालच त्रिवेंद्र सिंग रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांना आपला राजीनामा सोपवला. त्रिवेंद्र सिंग रावत यांच्याविषयी आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदाच भाजपाने ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच एखादा मुख्यमंत्री बदलल्याची ही घटना आहे. गुजरातच्या आनंदी बेन पटेल यांच्याजागी विजय रूपाणी यांना नियुक्त केले गेले होते, परंतु तेंव्हा आनंदीबेन पटेल या राजकारणातून निवृत्त झाल्या होत्या.
तीरथ सिंग रावत यांचा शपथविधी आज संध्याकाळी ४ वाजता होणार असल्याची माहिती मिळत आहे.