संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. आता तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीनेही त्यांच्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. संसदीय समितीने तपास केल्यानंतर पक्ष मोइत्रा यांच्यावर योग्य ती कारवाई करेल, असे तृणमूल काँग्रेसने रविवारी एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. गेल्या सात दिवसांपासून तृणमूल काँग्रेस पक्षाने या प्रकरणाबाबत मौन बाळगले होते.
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मोइत्रा यांनी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून महागड्या भेटी घेतल्याचा आरोप आहे. ‘मोइत्राप्रकरणी पक्ष लवकरच योग्य तो निर्णय घेईल,’ असे पक्षाचे नेते डेरेक ओब्रायन यांनी म्हटले आहे. संसदीय नैतिकता पालन समितीच्या अहवालानंतरच तृणमूल त्यांच्यावर कारवाई करू शकते, असे सांगितले जात आहे.
लोकसभेच्या नैतिकता समितीने मोइत्रा यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि मोइत्रा यांचे जुने मित्र जय अनंत देहादयानी यांना २६ ऑक्टोबर रोजी साक्ष देण्यासाठी बोलावले आहे. या प्रकरणी देहादाराई यांनी मोइत्रा यांच्याविरोधात सीबीआयकडे स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे, त्याचा उल्लेखही दुबे यांनी लोकसभाध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
हे ही वाचा:
कर्नाटकमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मुस्लीम विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास काँग्रेस सरकारची परवानगी
गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली
बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!
बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!
‘आम्ही प्रसारमाध्यमांमधील वृत्तांचे निरीक्षण केले आहे. पक्ष नेतृत्वाने मोइत्रा यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी ही भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. तथापि, हे प्रकरण निवडून आलेल्या खासदाराशी, त्यांच्या अधिकारांशी आणि विशेषाधिकारांशी संबंधित असल्याने, या प्रकरणाची आधी संसदेच्या योग्य मंचाद्वारे चौकशी होणे गरजेचे आहे. त्यानंतरच पक्ष नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल,’ असे डेरेक ओब्रायन यांनी स्पष्ट केले.