वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचारानंतर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये अजूनही तणावाचे वातावरण आहे. अशातच आक्षेपार्ह विधाने करून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदर यांनी असेच एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर कोणी वक्फ मालमत्तेकडे पाहण्याची हिंमत केली तर त्याचे डोळे काढू आणि त्याची हाडे तोडली जातील. त्यांनी केलेल्या या हिंसक विधानानंतर भाजपाने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
मुर्शिदाबादमधील हिंसाचारावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगाल भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेस खासदार बापी हलदर यांनी हिंसक विधान केल्याबद्दल त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. शिवाय त्यांच्यावर कारवाई न केल्याबद्दल राज्य पोलिसांचा निषेध केला.
हलदर असेही म्हणाले की, जोपर्यंत ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत तुमच्या पूर्वजांच्या विश्वासाचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. ही कोणाच्याही वडिलांची मालमत्ता नाही. पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी राज्य पोलिस हलदर यांच्यावर काय कारवाई करत आहेत असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, मुर्शिदाबादमधून हिंदूंना स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे. येथे कट्टरपंथीयांना हिंदूंचे अस्तित्वच नष्ट करायचे आहे. मुर्शिदाबादच्या सुती, धुलियान, समसेरगंज आणि जंगीपुरा येथे झालेल्या हिंसाचारात किमान तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. सध्या नवीन हिंसाचाराचे कोणतेही वृत्त नाही. दरम्यान, या संघर्षात किमान १८ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वक्फच्या मालमत्तांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे डोळे काढून टाकण्याची आणि हातपाय तोडण्याची धमकी देत, हलदर यांनी त्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण केला. मजुमदार यांनी पोस्ट करत तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “मथुरापूर मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदर यांनी एक भयंकर धमकी दिली आहे. डोळे काढण्याची आणि हातपाय तोडण्याची भाषा केली आहे. या कट्टरपंथीयांनी मुर्शिदाबादमधील असहाय्य, निष्पाप हिंदूंवर क्रूर छळ आणि हिंसाचाराला थेट प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसांनी या व्यक्तीविरुद्ध काय कारवाई केली आहे?”
हेही वाचा..
झारखंड: महायज्ञानंतर मिरवणुकीवर दगडफेक!
तृणमूल काँग्रेस म्हणते, सीमासुरक्षा दलाच्या मदतीने मुर्शिदाबादेत दंगल!
सलमान खानला पुन्हा धमकी, घरात घुसून ठार मारू!
… तर मुस्लिम तरुणांना पंक्चर दुरुस्तीचे काम करावे लागले नसते
दरम्यान, मुर्शिदाबादमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आणि वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्धच्या निदर्शनांनंतर झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात शनिवारी दुपारपर्यंत एकूण १८० लोकांना अटक करण्यात आली. तर, जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त भागात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. प्रभावित भागात इंटरनेट देखील बंद आहे, सुरक्षा दल अजूनही मुख्य रस्त्यांवरील वाहनांची तपासणी करत आहेत.