विरोधी पक्षांचा गट असलेल्या ‘इंडी’ आघाडीने संसदेच्या परिसरात सत्ताधारी पक्षांविरोधात आंदोलन केले. मात्र, या आंदोलनामध्ये तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने गैरहजेरी दर्शवल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. इंडी आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यापूर्वीही तृणमूल काँग्रेसने विरोधी पक्षाकडून संसदेत उपस्थित केले जात असलेले मुद्दे पक्षाला पटत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे या पक्षाने त्यांची वेगळी भूमिका घेतली होती. अदानी समूहाला सातत्याने लक्ष्य करण्यात येत असलेली भूमिका मान्य नसल्याचे तृणमूलने म्हटले होते.
दरम्यान, लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात अमेरिकेने अदानी यांच्यावर आरोप केल्याबद्दल काँग्रेस आणि इतर विरोधी खासदारांनी संसदेत निषेध सुरूच ठेवला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्यासह खासदारांनी ‘मोदी अदानी एक है, अदानी सुरक्षित है’ असे छापलेले जॅकेट घातलेले दिसले. याला तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने गैरहजेरी लावली. तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद म्हणाले की, पक्षाकडे इतर मुद्दे अधोरेखित करण्यासाठी आहेत परंतु संसदेमध्ये आम्ही विरोधकांसोबत आहोत.
आझाद यांनी म्हटले की, सभागृहामध्ये आमची एकच रणनीती आहे परंतु, त्याच वेळी आमच्याकडे इतर भिन्न मुद्देही आहेत जे आम्हाला पुढे आणायचे आहेत. समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनीही म्हटले की आम्ही एकत्र आहोत.
यापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेत अदानी समूहाचा मुद्दा गाजल्यानंतर कामकाज तहकूब करावे लागले होते. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने स्पष्ट केले होते की, त्यांचा पक्ष आता सार्वजनिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार आहे. तृणमूलने मणिपूरमधील परिस्थिती, पश्चिम बंगालसोबत केंद्रीय योजनांच्या अर्थसंकल्पातील भेदभाव आणि अपराजिता महिला आणि बाल विधेयक, २०२४ मंजूर करण्यास होणारा विलंब या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे म्हटले होते.
हे ही वाचा..
कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी ‘महाकुंभ ग्राम’
शपथविधीसाठी खास ‘संत तुकाराम महाराज केशर पगडी’ तयार
पुतीन यांना ‘मेक इन इंडिया’ची भुरळ!
पश्चिम बंगालमधून २२७७ कंपन्यांनी केले स्थलांतर
तृणमूलचे लोकसभेतील उपनेते काकोली घोष दस्तीदार म्हणाले होते की, तृणमूल काँग्रेस संसदेत सार्वजनिक समस्या मांडण्यावर भर देईल. तृणमूल काँग्रेसला संसदेचे कामकाज चालवायचे आहे. केवळ एका मुद्द्यामुळे संसद विस्कळीत होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की ते इंडी आघाडीचा एक भाग राहतील परंतु, त्यांचे स्वतःचे मत आहे. आम्ही भाजपचा सामना करू परंतु, भाजपशी लढण्याचा आमचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.