पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) फसवणूक केली आणि मुस्लिम समुदायांना खूश करण्यासाठी त्यांचे अधिकार हिरावून घेतले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला.
कोलकाता उच्च न्यायालयाने सन २०१०नंतर पश्चिम बंगालमध्ये वितरित केलेली सर्व ओबीसी प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या संदर्भात पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले आहे. न्यायालयाने पश्चिम बंगाल मागासवर्ग आयोगाला १९९३च्या कायद्यानुसार ओबीसींची नवीन यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
बारासात येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, ‘राज्यघटनेबद्दल रात्रंदिवस ओरडणाऱ्या या सर्वांनी येऊन बंगालमध्ये काय घडत आहे, ते पाहावे. व्होट जिहादसाठी तृणमूलने पश्चिम बंगालमध्ये ओबीसींची फसवणूक केली. न्यायालयाने त्यांचा पर्दाफाश केला. कोलकाता उच्च न्यायालयाने सांगितले की, ७७ मुस्लिम समुदायांचा ओबीसी यादीत समावेश करण्यात आला आहे. ते घटनाबाह्य आहे. ते लाखो ओबीसींच्या हक्काशी खेळले, हा अधिकार डॉ. बाबासाहेबांनी त्यांना दिला होता,’ असे मोदी म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सन २०१०नंतर वितरित केलेल्या ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला विरोध केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, त्या न्यायाधीशांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित कसे करू शकतात?
‘तुम्ही तुमच्या गुंडांना आता न्यायाधीशांच्या मागे लावणार का? तृणमूल न्यायव्यवस्थेची कशी गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे, हे संपूर्ण देश पाहात आहे,’ असे ते म्हणाले. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आपापल्या कार्यकाळात पश्चिम बंगालची लूट केल्याबद्दल त्यांनी आणखी टीका केली.
‘बंगाल आधी काँग्रेसने लुटले आणि नंतर डाव्यांनी. आता तृणमूल काँग्रेस दोन्ही हातांनी लूट करत आहे. काँग्रेस, माकप आणि तृणमूल या तिघांवर पश्चिम बंगाल लुटल्याचा आरोप आहे. माकपला दिलेले प्रत्येक मत तृणमूलच्या खात्यात जाईल हेही लोकांना माहीत आहे. तृणमूल आणि डावे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर दिल्लीत (केंद्रात) त्यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पडद्यामागे खेळले जाणारे सर्व खेळ बंगालला समजले आहेत,’ असे मोदी म्हणाले.
तृणमूलचे आमदार हुमायून कबीर यांच्या ‘भाजप समर्थकांना भागीरथी नदीत फेकून द्या’ या वक्तव्याबद्दल आक्षेप घेत पंतप्रधान यांनी सत्ताधारी पक्ष सत्य सहन करू शकत नाही, अशी टीका केली. ‘जो कोणी तृणमूल पक्षाचे सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो, त्याला पक्षाने लक्ष्य केले आहे. तृणमूलचे एक आमदार म्हणाले, ‘हिंदूंना भगीरथी नदीत बुडवणार. ते रामकृष्ण मिशन, इस्कॉन, भारत सेवाश्रम संघासारख्या महान संस्थांच्या संतांचा ते अपमान करत आहेत. त्यांची व्होट बँक खूश करण्यासाठी आणि व्होट जिहादला पुढे नेण्यासाठी हे केले जात आहे,” असे मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
१९६२ चे चिनी आक्रमण म्हणे ‘कथित’; मणिशंकर यांच्याकडून माफी
हिंदुत्व, ईश्वर समर्थक, माफियाविरोधी प्रतिमेमुळे योगी यांचे स्थान बळकट
नवीन पटनायक यांचा थरथरणारा हात पकडला!
‘आप’चा पाय खोलात; मानहानीच्या खटल्यात आतिशी यांना समन्स
देशाला विशेषत: पश्चिम बंगालला नवीन गॅरंटी देण्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान म्हणाले, ‘ज्यांनी खाल्ले आहे, त्यांना बाहेर काढेन आणि ज्यांचे खाल्ले आहे, त्यांना ते परत केले जाईल,’ असेही ते म्हणाले. रेमल चक्रीवादळाच्या परिणामांवर केंद्र सातत्याने लक्ष ठेवत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. “सर्वप्रथम, मी माँ कालीपुढे नतमस्तक होतो. तिच्या आशीर्वादाने आम्ही मिळून चक्रीवादळाचा (रेमल) सामना केला. भारत सरकारने चक्रीवादळाचे सतत निरीक्षण केले आणि मी देखील सतत संपर्कात होतो. एनडीआरएफ आणि इतर पथकांनी चांगले काम केले. केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत आहे,’ असे ते म्हणाले.