बिहारमध्ये राजकीय पट पालटणार? नितीश कुमार सरकारकडून २२ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

शिवाय ४५ वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश

बिहारमध्ये राजकीय पट पालटणार? नितीश कुमार सरकारकडून २२ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

बिहारमध्ये गेल्या २४ तासांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून मोठा राजकीय पालट होण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार वर्षभराच्या आत पुन्हा एकदा भाजपाशी युती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राजदशी काडीमोड घेऊन नितीश कुमार यांचा जदयू भाजपासोबत सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. एकीकडे सत्ताबदलाची चर्चा असताना दुसरीकडे नितीश कुमार यांनी बिहारमधील तब्बल २२ आयएएस अधिकारी आणि ४५ इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे या चर्चांना आणखी जोर मिळाला आहे.

बिहार सरकारने चार दिवसांपूर्वी २९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर शुक्रवार, २६ जानेवारी रोजी आणखी २२ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी जिल्हा न्यायदंडाधिकारी स्तरावरचे प्रशासक होते. त्याव्यतिरिक्त बिहार प्रशासकीय सेवेतील ४५ इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. वरीष्ठ आयएसएस अधिकारी आणि पाटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांना थेट मुख्यमंत्री सचिवालयात विशेष सचिव पदावर बदली करण्यात आली आहे. अशाप्रकारे गेल्या चार दिवसांत बिहार सरकारने आत्तापर्यंत तब्बल ५१ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे.

हे ही वाचा:

नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार पण आता भाजपासोबत?

‘ज्ञानवापीच्या जागी भव्य मंदिर होते’

प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झळकला ‘शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ’!

हबल दुर्बिणीने शोधला सूर्यमालेबाहेरील पाण्यासह एलियन ग्रह!

गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे जात आपले मुख्यमंत्रीपद टिकविणारे जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार आता पुन्हा भाजपासोबत येण्याची शक्यता आहे. अलिकडे २०२० साली झालेल्या निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांनी भाजपासोबत प्रचार केला. २०२२ मध्ये त्यांनी भाजपाकडे पाठ फिरवून पुन्हा लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी आघाडी केली. पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. पण दोनच वर्षांच्या आत पुन्हा एकदा नितीश कुमार बाजू बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Exit mobile version