मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सरकारचा दुसरा शपथविधी सोहळा उद्या म्हणजेच २५ मार्च रोजी होणार आहे. हा सोहळा लखनौमधील एकना स्टेडियमवर दुपारी चार वाजता होणार आहे. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री योगी यांच्यासह उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्र सरकारचे मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र आणि भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मुलायम सिंह यादव, मायावती आणि अखिलेश यादव यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांसह उद्योग आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
आमंत्रित पाहुण्यांच्या यादीत उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, आनंद महिंद्रा यांसारख्या अनेक मोठ्या नावांचाही समावेश आहे. तर बॉलिवूडमधील अक्षय कुमार, कंगना रणौत, अनुपम खेर, बोनी कपूर, अजय देवगण, विवेक अघोत्री यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केले आहे.
हे ही वाचा:
माजी सरन्यायाधीश आर सी लाहोटी यांचे निधन
‘परीक्षेचा हिजाब वादाशी संबंध नाही’, तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
काश्मीर फाईल्सने जमवला २०० कोटींचा गल्ला! रचला ‘हा’ अनोखा विक्रम
विधानसभेत एकमताने ‘शक्ती कायदा’ मंजूर
मुख्यमंत्री योगिंच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजधानी लखनौ भगवेमय झाले आहे. लखनौमधील प्रत्येक चौक आणि रस्ता भगव्या रंगाने भरून गेला आहे. योगी सरकारच्या कामगिरीचे आणि सुरू असलेल्या विकासकामांचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. या शपथविधी सोहळ्याला राज्यभरातून सुमारे ४५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.