राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या नशिक जिल्ह्यात तसेच राज्याचे अन्न नागरी ,पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघातील येवल्यात टोमॅटोचा रस्त्यावर लाल चिखल पाहायला मिळतोय. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत आवक अधिक येत असल्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोला मातीमोल दर मिळाला आहे. कमी दर मिळाल्यानं संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकल्याने येवला-नगर राज्य मार्गावर टोमॅटोचा लाल चिखल पाहायला मिळाला.
येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील तरुण शेतकरी आदित्य जाधव याने टोमॅटोला भाव मिळत नसल्याने संतप्त होत रस्त्यावर टोमॅटो फेकून दिल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्याने ८० हजारहून अधिक खर्च करून एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली, सुरुवातीला चांगला भाव मिळाला होता. आदित्य जाधव यांना त्यातून १५ हजार रुपयांच्या जवळपास रक्कम हातात आली.
दिवसेंदिवस टोमॅटोचे भाव कोसळत गेल्याने आदित्य जाधव या शेतकऱ्याला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत २० किलोच्या कॅरेट टोमॅटोला भाव वीस ते तीस रुपये मिळाले. म्हणजेच एका किलोला जवळपास एक ते दीड रुपये इतका मातीमोल बाजार भाव मिळाला. या परिस्थितीमुळे उत्पादन खर्च तर दूरच तोडणी आणि वाहतूक खर्चही अर्धा मिळणार नसल्याने संतप्त होत या शेतकऱ्यांने येवला-नगर राज्य मार्गावर येवल्यातील विंचूर चौफुली येथे टोमॅटो फेकून देत आपला संताप व्यक्त केला. वाहनांच्या खाली टोमॅटो दबल्याने रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत होती.
हे ही वाचा:
मालकासकट बाईक उचलणाऱ्या पोलिसाची उचलबांगडी
६ वर्ष अमेरिकेतील तुरुंगात, आता अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री
सीडीएस, जनरल बिपिन रावत यांनी तालिबानला दिला ‘हा’ इशारा
हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत ‘भोक पडलेल्या फुग्याला’ एवढे का घाबरत आहेत?
नाशिक, नगर, पुणे, औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच राजस्थान, बंगलुरू आणि गुजरात या ठिकाणी प्रामुख्याने स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत आहे. या कारणामुळे टोमॅटो उत्पन्नाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी नसल्याने आणि गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरावर होताना दिसते आहे. लासलगावसह पिंपळगाव बसवंत, वणी, चांदवड आणि येवला बाजार समितीत टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेट्सला ६० ते १०० रुपयांपर्यंत म्हणजे तीन ते पाच रुपये किलो इतका बाजार भाव मिळतोय. कमी दरामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला वाहतूक, मार्केटमधील चढ-उतर, शेतातून तोडणीचा खर्चही भरून निघत नाही, अशी स्थिती आहे.