गुन्हा दाखल करणे म्हणजे न्याय करणे असे होत नाही असे धक्कादायक विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पूजा चव्हाण प्रकरण आणि वनमंत्री संजय राठोड याने दिलेल्या राजीनाम्या संदर्भात त्यांनी हे विधान केले आहे.
सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. याच पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राठोड याच्या राजीनाम्यासंबंधी पण भाष्य केले.
कोणाला आयुष्यातून उठवायचे म्हणून तपास यंत्रणेवर दबाव असू नये
“सरकार चालवत असताना न्यायाने वागणे ही आमची जबाबदारी असते. पण गेल्या काही महिन्यात गलिच्छ राजकारण सुरु झाले आहे. निःपक्षपातीपणे तपास आणि चौकशी झाली पाहिजे. तपास यंत्रणेवर कोणाला वाचवण्यासाठी दडपण असता कामा नये, तसेच कोणाला आयुष्यातून उठवायचेच आहे म्हणूनही तपस यंत्रणेवर दबाव असता कामा नये.” असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
“प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. फक्त राजीनामा घेणे, पुरावे असोत-नसोत गुन्हा दाखल करणे म्हणजे न्याय नाही. ज्या क्षणी आम्हाला घटना कळली त्या क्षणीच आम्ही पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी कालबद्ध तपास करावा अशा सूचना आम्ही पोलिस यंत्रणेला दिलेला आहे.” अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.