तृणमुल काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि खासदार सिसिर अधिकारी यांनी रविवारी तृणमुल काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अधिकारी यांनी कमळ हाती धरले आहे. भाजपा प्रवेशाच्या वेळी अधिकारी यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’ ची घोषणा दिली आहे. अधिकारी यांचा भाजपा प्रवेश हा ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारिला लागले आहेत. सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता उलथवून बंगालमध्ये ‘असोल परिबोर्तन’ आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी कसून तयारीला लागली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही बंगालमध्ये प्रचार सभा घेतल्या. अमित शहा यांच्या बंगाल मधील सभे दरम्यान तृणमुल काँग्रेसचे खासदार सिसीर अधिकारी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एर्गा भागात झालेल्या शहा यांच्या प्रचार सभेत अधिकारी हे भाजपावसी झाले. यावेळी त्यांनी तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
हे ही वाचा:
मी तुम्हाला बंगालच्या लोकांच्या विकासाला आणि स्वप्नांना लाथ मारू देणार नाही
‘धनानंदां’च्या कचाट्यातून सुटकेसाठी धडपडणारा महाराष्ट्र
मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
“मला आणि माझ्या कुटुंबाला तृणमुल पक्ष सोडण्यास भाग पाडले गेले याची इतिहास नोंद घेईल. बंगालमधल्या राजकीय अत्याचारांविरोधात आम्ही पुन्हा एकदा उभे राहू” असे अधिकारी यांनी सांगितले. “आम्ही मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वात काम करू. सुवेंदू हा फार मोठ्या फरकाने निवडून येईल आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातून तृणमुल काँग्रेस पक्षाचा नामोनिशाण संपेल.” असे अधिकारी म्हणाले
सिसीर अधिकारी यांचा मुलगा आणि ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मिनिस्टर राहिलेले सुवेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सुवेंदू हे नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणार आहेत. तिथे ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टक्कर देणार आहेत. पूर्व मेदिनीपूर हा जिल्हा अधिकारी कुटुंबाचा गाद मानला जातो. सिसीर अधिकारी यांच्या भाजपा प्रवेशामुळे या भागातील भाजपाचे स्थान अधिक मजबूत झाल्याचे म्हटले जात आहे.