केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या गाडीवर हल्ला

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या गाडीवर हल्ला

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री व्ही.मुरलीधरन यांच्या गाडीवर पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाला आहे. पश्चिम मिदनापूर येथील पंचखूडी भागात तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. मुरलीधरन यांच्या गाडीची काच या गुंडांनी फोडली. तसेच त्यांच्या खासगी कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला आहे.

२ मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर राज्यात हिंसेचा तांडव सुरु झाला. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर, समर्थकांवर हल्ले केले जात आहेत. यात लूटमार, मारहाण, जाळपोळ, तोडफोड, महिलांवर अतिप्रसंग अशा हिंसेच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याच हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे महत्वाचे नेते सध्या बंगालमध्ये तळ ठोकून आहेत. तृणमूलच्या या राजकीय हिंसेचा बळी ठरलेल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना पक्षाचे नेते भेट देत आहेत.

हे ही वाचा

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य

७ किलो युरेनियमसह दोघांना अटक, एटीएसची कारवाई

मुंबईतील सोसायट्यांमधील लसीकरणाचे निकष…

सत्ताधारी पक्ष ते प्रमुख विरोधी पक्षही नाही, काँग्रेसची अधोगती सुरूच…

भाजपाचे खासदार, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन हे सध्या याच कारणासाठी बंगालमध्ये आहेत. गुरुवार, ६ मे रोजी मुरलीधरन हे पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातून प्रवास करत असताना त्यांची गाडी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवली. या गुंडांच्या हातात लाकडी दंडुके होते. त्यानेच मुरलीधरन यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीची काच फोडण्यात आली. तसेच मुरलीधरन यांच्या खासगी कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला. मुरलीधरन यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून या हल्ल्याची माहिती दिली. या हल्ल्याचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.

बंगालमधील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेला भाजपा कार्यकर्ता बिस्वजीत महेश याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मुरलीधरन जाणार होते. पण या हल्ल्यानंतर पोलिसांनी त्यांना महेश यांच्या घरी न जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुरलीधरन यांनी आपली ही भेट रद्द केली. पुढे त्यांनी डेब्रा येथे जाऊन तेथील कार्यकर्त्यांची भेट घेतली. या कार्यकर्त्यांवरही हल्ले झाले असून त्यांची घरी उध्वस्त करण्यात आली आहेत.

Exit mobile version