ठाण्यातील कौसा रुग्णालयाच्या बांधकामाला वर्षानुवर्षे होत असलेल्या विलंबामुळे आता नवीन प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत. मुख्य म्हणजे सदर रुग्णालयावर पालिकेकडून कोट्यावधी रुपयांचा चुराडा झालेला आहे, त्यामुळे हा खर्चच आता वादात सापडलेला आहे. रुग्णालयास झालेल्या विलंबामुळे मुंब्राच्या नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. तसेच मुंब्रा येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोपही केलेला आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्न या रुग्णालयासंदर्भात उघडपणे उपस्थित केले जात आहेत.
चार मजली रुग्णालय ठरले असताना, सद्यस्थितीमध्ये केवळ एकच मजला तयार झालेला आहे. निविदेनुसार तळघर, ग्राउंड प्लस चार मजली हॉस्पिटल होते. पण प्रत्यक्षात मात्र एकच मजला उभारण्यात आला आहे. यातील महत्त्वाची मेख म्हणजे हा एक मजला उभारण्यासाठीही महापालिकेला आठ वर्षांचा काळ लोटला. अद्यापही रुग्णालयाचे लोकार्पण झाले नसल्यामुळे, आता या खर्चावरूनही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हे ही वाचा:
लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!
मंगळवार पर्यंत आर्यन खान तुरुंगातच
सदर रुग्णालयाचा खर्च हा २७ कोटींवरून १४७ कोटींपर्यंत गेल्यामुळे, आता या रुग्णालयातील कामकाजामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता भाजपाकडून केली जात आहे. रुग्णालयाचे काम करणारा ठेकेदार हा शिवसेना आणि राष्ट्रवादी पार्टीच्या नेत्यांच्या संपर्कातला असल्याचा आरोपही भाजपाने केलेला आहे.
रुग्णालयासाठी मूळ निधी हा २७ कोटी २४ लाखांचा मान्य झाला होता. त्यानंतर पुन्हा सुधारीत निधी म्हणून ५४ कोटी ३८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. अशाच पद्धतीने सुधारीत निधी मंजूर करूनच सध्याच्या घडीला रुग्णालयावर एकूण खर्च १४७ कोटींपेक्षा जास्त झालेला आहे. भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले असून, त्यांनी संबंधित रुग्णालयामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावाही केलेला आहे.
रुग्णालयाचे काम २०१४ मध्ये सुरू झाले आणि आजपर्यंत ते पूर्णच नाही झाल्यामुळे आता अनेक बाबींवर शंका उपस्थित झालेली आहे. मुख्य म्हणजे रुग्णालयासाठी होणारा अपेक्षित खर्च हा पाचपटीने अधिक वाढला आहे. हा वाढीव खर्च करण्याची मुभा अधिकारी वर्गाला नेमकी कुणी दिली असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तसेच रुग्णालयाचे कामकाजाच्या निविदा देण्यात येणारी ‘शायोना काॅर्पोरेशन’ या एकाच कंपनीला कशा मिळाल्या असे अनेक वादग्रस्त प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत.