पश्चिम बंगालमधील वादविवाद थांबण्याची चिन्हे नाहीत. बंगालच्या विधानसभेत भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार एकमेकांना भिडल्याची घटना घडली आहे.
भाजपाचे आमदार मनोज तिग्गा आणि तृणमूलचे आमदार असित मजुमदार यांच्यात ही मारामारी झाली. त्यात असित मजुमदार हे जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या मारामारीच्या घटनेनंतर विधानसभेतून शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपाच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. अधिकारी यांच्यासह तिग्गी, नरहरी महातो, शंकर घोष, दीपक बर्मन ही निलंबित झालेल्या आमदारांची नावे आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत या आमदारांना निलंबित केले गेले आहे.
रामपुरहट येथे झालेल्या जळित कांडासंदर्भात चर्चा केली जावी अशी मागणी भाजपाच्या आमदारांनी विधानसभेत केली होती. त्यावरून हा राडा झाला. रामपुरहट येथे ८ जणांना जाळण्याची घटना घडली होती. एकाच कुटुंबातील या ८ जणांना मारहाण करून जिवंत जाळण्यात आले होते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येनंतर हे जळीत कांड घडले होते.
बंगाल विधानसभेच्या बजेट सत्राचा सोमवार हा अखेरचा दिवस होता, त्यातच हा वाद झाला. भाजपाच्या आमदारांनी विधानसभेतून बाहेर आल्यावर हा आरोप केला की, वीरभूममध्ये घडलेल्या जळीत कांडावर आम्ही चर्चा करण्याची मागणी केली होती, पण त्यानंतर तृणमूलच्या आमदारांनी मारहाण केली.
हे ही वाचा:
‘अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर उद्धव साहेबांनी विचार करायला हवा’
रमापती शास्त्री यांची प्रो-टेम स्पीकर म्हणून नियुक्ती!
अभिनेता विल स्मिथने का मारली सूत्रसंचालकाच्या श्रीमुखात?
१ एप्रिलला पंतप्रधान मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार
मनोज तिग्गा यांनी सांगितले की, तृणमूलच्या आमदारांनी त्यांना ठोसे लगावले आणि त्यात त्यांचा शर्टही फाटला. यानंतर भाजपाचे आमदार व विधानसभेतील भाजपाचे विरोधी पक्षनेता शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी बंगाल विधानसभेबाहेर पाहायला मिळाली. भाजपाचे वरिष्ठ नेता बीएल संतोष यांनी म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांचे सरकार आल्यापासून तेथील राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे.