झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे चंपाई सोरेन यांच्या सरकारला सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे असतानाच पक्षाचे वरिष्ठ नेते लोबिन हेम्ब्रोम यांनी हेमंत सोरेन यांना रविवारी घरचा आहेर दिला. चुकीच्या सल्ल्यामुळेच हेमंत सोरेन यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली, असा दावा त्यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने अटक केली आहे.
‘हेमंत सोरेन यांनी सातत्याने माझा सल्ला धुडकावला. त्यामुळेच त्यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ ओढवली. त्यांच्याभोवती नेहमीच चुकीच्या माणसांचा गराडा असे,’ अशी टीका साहिबगंज येथील बोरिओचे आमदार हेम्ब्रोम यांनी केली आहे. हेम्ब्रोम यांनी हेमंत सोरेन यांचे वैयक्तिक आणि प्रसारमाध्यमांचे सल्लागार तसेच, झारखंड मुक्ती मोर्चाच्या सल्लागारांना सोरेन यांच्या आताच्या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवले आहे. तसेच, झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्या आमदारांना हैदराबादमध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेतला.
झारखंडमधील बहुतेक जनतेला दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असताना अशासाठी इतका मोठा खर्च करण्यावरही त्यांनी नाराजी दर्शवली. तसेच, त्यांनी छोटा नागपूर टेनन्सी कायदा व संथल परगणास टेनन्सी कायदा यांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
या दोन्ही कायद्यांत आदिवासी जमीन बिगर आदिवासींना विकण्यास बंदीची तरतूद करण्यात आली आहे. हेम्ब्रोम यांनी राज्यात मद्यविक्रीवर बंदी आणण्याचीही मागणी केली. अर्थात सोमवारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी ते चंपाई सोरेन सरकारला पाठिंबा देतील, असे आवर्जून सांगितले. चंपाई सोरेन सरकारला ५ फेब्रुवारी रोजी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
हे ही वाचा:
उत्तराखंड मंत्रिमंडळाची समान नागरी कायद्यावर मोहोर
‘ग्रॅमी’वर भारतीयांची मोहोर; झाकीर हुसैन यांचा तीन तर, राकेश चौरासियांचा दोन ग्रॅमीने गौरव
‘नव’ नामक वाघाच्या मृत्यूने लुधियाना टायगर सफारी पर्यटकांसाठी झाली बंद!
मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या लाभापोटी २००हुन अधिक जोडप्यांनी केला ‘बनावट’ विवाह!
८१ जागांच्या झारखंड विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल मिळून स्थापन झालेल्या आघाडीचे ४७ आमदार आहेत. तर, एकमेव सीपीआयएमएल (एल) पक्षाच्या आमदाराने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला आहे.