पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी काँग्रेस पक्षाशी पडद्यामागचा संवाद सुरु असल्याचे वृत्त फेटाळून लावले. त्यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांच्या म्हणण्यानुसार सामंजस्याची वेळ निघून गेली आहे. सिंग म्हणाले की, काँग्रेससोबत फारकत घेण्याचा निर्णय अंतिम आहे कारण तो बराच विचार करून घेण्यात आला आहे.
“मी सोनिया गांधीजींच्या पाठिंब्याबद्दल त्यांचा आभारी आहे पण आता काँग्रेसमध्ये राहणार नाही,” असे सिंग यांनी सांगितले. कॅप्टन यांना पक्षात राहण्यासाठी राजी करण्यासाठी काँग्रेस नेते पडद्यामागच्या चर्चेत गुंतले असल्याचा दावा प्रसारमाध्यमांच्या वृत्तानंतर करण्यात आला. स्वत:चा राजकीय पक्ष सुरू करण्याच्या आपल्या पूर्वीच्या घोषणेचा पुनरुच्चार करताना अमरिंदर सिंग म्हणाले की, पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते लवकरच भाजपा, अकाली दलातील काही गट आणि इतर पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा करणार आहे.
“मी लवकरच माझा स्वतःचा पक्ष सुरू करेन आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सुटल्यानंतरभाजपा, अकाली दलातील काही गट आणि इतरांशी २०२२ साली होऊ घातलेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा करेन. मला पंजाब आणि तेथील शेतकर्यांच्या हितासाठी मजबूत सामूहिक शक्ती निर्माण करायची आहे.” असे सिंग म्हणाले.
नवज्योतसिंग सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यातील राजकीय भांडणाचा परिणाम म्हणून पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास सांगितल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजीनाम्यानंतर, सिंग यांनी सिद्धू यांच्यावर टीका अधिक तीव्र केली, ज्यांची नुकतीच कॅप्टनच्या इच्छेविरुद्ध पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
हे ही वाचा:
चीनच्या नव्या कुरापती, नदी प्रदूषित करण्याचा डाव
विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा
भारताचा हा बॉम्ब का वाढवतोय चीन, पाकिस्तानची चिंता?
मोदी-पोप बैठकीत काय चर्चा होणार?
दरम्यान, पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. जिथे दोन्ही नेत्यांनी राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका आणि अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष स्थापन करण्याच्या घोषणेवर चर्चा केली.