पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मालदीवचे तीन मंत्री निलंबित

पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मालदीवचे तीन मंत्री निलंबित

पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या तीन मंत्र्यांना रविवारी मालदीव सरकारने निलंबित केले आहे.

मंत्र्यांच्या या आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा भारताने मालदीव सरकारकडे मांडला होता. त्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मालशा शरीफ, मरियम शिऊना आणि अब्दुल्ला मेहझूम माझिद या तीन मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नुकताच लक्षद्वीपचा दौरा केला. ३६ बेटांचा समावेश असलेल्या लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी मोदींनी हा दौरा केल्याचे मानले जाते. या दौऱ्यादरम्यान मोदी यांनी तेथील छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती. त्यानंतर शिऊना यांनी ‘एक्स’वर मोदी यांना विदूषक आणि कळसुत्री बाहुली असे संबोधले होते. त्यांनी नंतर ती पोस्ट डिलिट केली असली तरी या त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मालदीवचा निषेध करण्यात आला.

अब्दुल्ला मेहझूम माजिद यांनी ‘भारताच्या पर्यटनाला यश लाभावे, अशी माझी इच्छा असली तरी मालदीवला इतके स्पष्टपणे लक्ष्य करणे मुत्सद्दीपणाचे नाही. आमच्या रिसॉर्टच्या पायाभूत सुविधा त्यांच्या एकूण बेटांपेक्षा जास्त असल्याने समुद्रकिनारी पर्यटनामध्ये स्पर्धा करताना भारताला महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागतो,’ असे वक्तव्य केले होते. त्यांनीही नंतर ही पोस्ट डिलिट केली. तर, खासदार झाहिद रामीझ यांनीही मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या छायाचित्राबाबत टीका केली. मोदी यांचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी लक्षद्वीपची तुलन मालदीवशी केली होती.

हे ही वाचा:

अफगाणिस्तान सिरीजमधून पंड्या, सुर्यकुमार आऊट

बोरिवलीत शस्त्रसाठ्यासह सापडले ६ संशयित!

उत्तर प्रदेशातील २५० वर्षे जुन्या मशिदीमध्ये ‘अजान’ देणार्‍या व्यक्तीला अटक!

तृणमूल काँग्रेस नेते सत्यन चौधरी यांची भरदिवसा हत्या!

मालदीवच्या या मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीचा मालदीव सरकारने ही भूमिका सरकारची नसून वैयक्तिक आहे, असे स्पष्ट केले होते. मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नाशीद आणि माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनीही द्वेषमूलक शेरेबाजी करणाऱ्या मंत्र्यांचा निषेध केला. दुसरीकडे, मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणीचे भारतातही तीव्र पडसाद उमटले. अनेकांनी ‘बॉयकॉट द मालदीव्स’ असे आवाहन केले. त्यानंतर अक्षय कुमार, सलमान खान, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर आणि कंगना राणावत यांनी मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या द्वेषपूर्ण व वंशवादी वक्तव्याचा निषेध करून लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले.

Exit mobile version