लवकरच राज्यसभेची निवडणूक होणार असून काँग्रेस पाठोपाठ आता भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपाने एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीला राज्यसभेसाठी भाजपा एकही जागा देणार नाही, अशी चर्चा असतानाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध असेल असं म्हटलं आहे. सर्वांकडे पुरेसा कोटा असल्याने चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचेही ते म्हणाले.
भाजपाने ज्या उमेदवारांना संधी दिली दिली आहे त्यात काँग्रेसला नुकतीच सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झालेलेल नेते अशोक चव्हाण, भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आमचे खासदार येतील ते महाराष्ट्रासाठी काम करतील. अशोक चव्हाण यांचा सन्मान केला गेला पाहिजे. त्यांनीही विकसित भारताचा संकल्प केला आहे. अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली कारण सन्मानपूर्वक वागणूक देणे हे पक्षाचे संस्कार आहेत, असं बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपा डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची संधी मिळाली आहे. याशिवाय पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना संधी देण्यात आली आहे. त्या दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. पण गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्याऐवजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती.
भाजपाने तीन उमेदवार जाहीर केल्यामुळे आता या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संधी दिली जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय भाजपा नेते विनोद तावडे यांच्यादेखील नावाची चर्चा होती. पण, त्यांनाही संधी देण्यात आलेली नाही. तसेच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनाही राज्यसभा निवडणुकीत संधी देण्यात आलेली नाही.
हे ही वाचा:
हल्दवानीमध्ये छतावरून दगडफेक करणाऱ्या महिलांवर होणार कारवाई!
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवाचा काँग्रेसला रामराम
१९६१ नंतर मणिपूरमध्ये स्थायिक झालेल्यांना ‘हद्दपार’ करणार!
न्यायालयाने ‘पूजेला’ परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री योगींनी ज्ञानव्यापी संकुलात केली प्रार्थना
राज्यसभा निवडणूक बिनविरोध
“राज्यसभा निवडणूक १०० टक्के बिनविरोध होईल. कारण सर्वांकडे आपआपला कोटा आहे. सर्वांकडे जिंकून येण्याचा कोटा असेल तर चुरस निर्माण करून महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेण्याची गरज नाही,” अशी स्पष्ट भूमिका भाजपाच्या वतीने प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले आहे.