महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकीत भाजपा तीन जागांवर आपले उमेदवार देणार आहे आणि यासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी देऊन भाजपाकडून संधी देण्यात आली आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या एकूण पाच जागांपैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी भाजपाकडून तीन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
भाजपाने संधी दिलेले संदीप जोशी हे नागपूरमधून असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत. संजय केनेकर हे पक्षाचा ओबीसी चेहरा आहेत. तर, संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. दादाराव केचे यांना विधानसभेच्यावेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं त्यामुळे त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
हे ही वाचा :
सोने तस्करी प्रकरण: रान्या रावचे सावत्र वडील सक्तीच्या रजेवर
हौथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करत ट्रम्प यांचा इशारा; हल्ला केला तर अवस्था नरकापेक्षाही वाईट होईल
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू कतालची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या
विराट कोहली आरसीबी संघात सामील
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रं तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या तिघांपैकी एकाला संधी मिळू शकते. राजेश विटेकर विधानसभेत गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी १०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते. शिवसेनेकडूनही कोणाला संधी मिळणार याकडे नजरा असणार आहेत.