निलंबन रद्द झालेल्या भाजपाच्या आमदारांनी ठेवले विधानसभेत पाऊल

निलंबन रद्द झालेल्या भाजपाच्या आमदारांनी ठेवले विधानसभेत पाऊल

भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर आणि आमदार पराग अळवणी यांनी मंगळवारी विधानसभेत प्रवेश केला. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील १२ आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय रद्द ठरविल्यानंतर प्रथमच या आमदारांनी विधानसभेत पाऊल ठेवले.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात १२ आमदारांच्या निलंबनप्रकरणी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला. त्यात महाराष्ट्रातील विधानसभेने केलेले हे निलंबन न्यायालयाने रद्द केले होते.

भारतीय जनता पार्टीच्या या तिन्ही आमदारांनी विधानसभेत पाऊल ठेवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी अशा घोषणा दिल्या.

हे ही वाचा:

‘भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प’

झारखंडमध्ये कोळसा खाणीत दबून १३ जणांचा मृत्यू

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर सिंधुदुर्ग न्यायालयाबाहेर राडा

Budget 2022 : गंगाकिनारी रसायनमुक्त शेतीला देणार चालना

 

गेल्या वर्षी जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यांनी तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या कक्षात बेशिस्त वर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. पण त्याविरोधात निलंबित आमदारांमधील भाजपाचे नेते आशीष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे न्यायालयाने हे निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला.

न्यायालयाने हा निर्णय देताना आणि सुनावणीदरम्यानही महाराष्ट्र विधानसभेच्या या कारवाईवर ताशेरे ओढले. हे निलंबन म्हणजे लोकशाहीला मारक आहे, भयंकर आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती.

Exit mobile version