मुंबईत गुरुवारी पहाटे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. ही घटना परळ परिसरातील त्यांच्या राहत्या घराजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “हल्लेखोरांना आणि मनोज जरांगेंना आज मला प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? मला गप्प केलं जाऊ शकत नाही. माझा लढा या देशातील ५० टक्के खुल्या जागा वाचवण्याचा आहे. या देशाला जातीपातीत तोडलं जाऊ नये यासाठी माझा लढा आहे.”
मुंबईत अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. गुन्हा नोंदवण्याची औपचारिकता सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तोडफोडीचे कृत्य मराठा क्रांती मोर्चाच्या युवा कार्यकर्त्यांनी केले असून तोडफोड करताना मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही दिल्या. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पैगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरंगे पाटील यांच्यावर सदावर्ते यांनी नुकतीच टीका केली होती.
हे ही वाचा:
प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण हे अहोभाग्य!
इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या राजीनामा मागितला
बेस्ट गरबाचे पारितोषिक जिंकले, मात्र आयोजकांनी केली पित्याची हत्या
धुळ्यात टिपू सुलतानाचा पुतळा; आमदार फारुक शाहविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!
या प्रकरणी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला काहीच कल्पना नसून मराठा शांततेत आंदोलन करत आहेत. हजारो गावात आंदोलन सुरु आहे. कोणी गाडी फोडली असेल तर त्याचे समर्थन होणार नाही. सरकारने आरक्षणाचा विषय संपवावा.