महिला गृहउद्योगाच्या नावाखाली राज्यभरात शेकडो महिलांची फसवणूक झाली आहे. असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय कुटे यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळेपर्यंत भारतीय जनता पक्ष या प्रश्नावर शांत बसणार नाही, असेही कुटे म्हणाले आहेत.
कुटे म्हणाले की, अजित हिवरे यांनी राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून महिलांसाठी स्वयंरोजगाराचा व्यवसाय सुरू केला. कंपनीने मसाले पॅकिंग मशीन, बटन मेकिंग मशीन आणि फ्लोअर मशिनची मल्टी लेव्हल मार्केटिंगद्वारे विक्री करण्यासाठी सुमारे २६ जिल्ह्यांमध्ये शाखा उघडल्या आहेत. त्या एका मशीनची किंमत ११ ते १५ हजार रुपयांच्या घरात आहे. जिल्ह्यात महिला विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करून व्यवसाय सुरू केला.
या मशीनमधून तयार होणारा माल खरेदी करण्याचे आश्वासनही कंपनीने दिले होते. सुरुवातीला कंपनीने दोन ते तीन महिने महिलांच्या मशीन बनवलेल्या वस्तूंची खरेदी सुरू ठेवली. त्यानंतर कंपनीने माल घेणे बंद केले. आता कंपनीचे पुणे कार्यालय बंद करण्यात आले असून कंपनीचा मालक हिवरे फरार झाला आहे. अकोला, बुलढाणासह अनेक जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावाचा वापर करून व्यवसाय वाढविल्याचे उघड झाले असल्याचे कुटे म्हणाले.
हे ही वाचा:
आसाममध्ये पंतप्रधान मोदींनी सात कॅन्सर रुग्णालये केली समर्पित
केरळच्या कम्युनिस्ट सरकारलाही पडली मोदींच्या गुजरातची भुरळ
नेताजींच्या संदेशासाठी दहा वर्षांच्या मुलाची सायकल सफर
ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट
हजारो महिलांनी पैसे जमा करून मशीन खरेदी केल्या आहेत. फसवणुकीनंतर महिलांनी अनेक ठिकाणी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. यावर कुटे म्हणाले, फसवणूक झालेल्या महिलांनी त्यांच्या गावातील भाजपाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून पोलिसांत तक्रार द्यावी.