देशात काँग्रेसकडून वारंवार संविधान बदलले जाणार असल्याचे बोलत फेक नरेटिव्ह पसरवले जात असताना यावरून आता केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. संविधान हातात घेऊन फिरत असलेल्यांनीच संविधान आणि लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला आहे. किरेन रिजिजू हे पुणे दौऱ्यावर असून ते पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
किरेन रिजिजू म्हणाले की, “संविधान हातात घेऊन फिरत असलेल्यांनीच संविधान आणि लोकशाहीची हत्या केली होती. बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत येण्यापासून रोखले होते, मंत्रिमंडळातही त्यांना घेतले नव्हते. पंडित नेहरूंनी त्यांचा वारंवार अपमान केला होता. आता हेच लोक भाजपकडून संविधान धोक्यात आहे असं म्हणून मुस्लिमांचा वोट बँक म्हणून वापर करत आहेत. पण दरवेळी हा समाज काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही,” अशी सणसणीत टीका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे.
“महाराष्ट्र वीरांची भूमी असून गेल्या काही काळापासून येथील राजकीय वातावरण राज्याला बदनाम करत आहे. अल्पसंख्याक समुदायाची दिशाभूल केली जात आहे. अल्पसंख्याक समुदायात सहा धर्म आहेत. पण काँग्रेसच्या काळात हे अल्पसंख्याक मंत्रालय केवळ मुस्लिमांचेच आहे, असे चित्र निर्माण केले होते. पण गेल्या १० वर्षात मोदी सरकारने सर्वांना समान संधी देऊन त्यांचा विकास केला,” असं रिजिजू म्हणाले.
हे ही वाचा :
आम्ही देण्याची भाषा तरी करतो, तुमची परंपरा तर वसुलीची!
स्त्री शक्तीचा जागर: त्यागाचे रूप माई सावरकर
मायक्रो आरएनएच्या शोधासाठी अमेरिकेचे व्हिक्टर ऍम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार
झाकीर नाईकची व्हिडीओवर संतापाची लाट
पुढे ते म्हणाले की, “परदेशात जाऊन राहुल गांधी देश विरोधी शक्तींच्या मदतीने कार्यक्रम घेतात. भारतात अल्पसंख्याक, दलित सुरक्षीत नसून त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, असे खोटे सांगून देशाची बदनामी करतात. महाराष्ट्रातही संविधान धोक्यात आहे असा खोटा प्रचार केला जात आहे. हा अल्पसंख्याक समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन बांधले जाणार असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळणार आहे. त्यामध्ये वसतीगृह, ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, क्रीडांगण आदीचा समावेश असणार आहे,” अशी माहिती किरेन रिजिजू यांनी दिली आहे.