केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी दहशतवादावर परखड भाष्य केले. श्रीनगरमध्ये युथ क्लबच्या सदस्यांना संबोधित करताना शाह म्हणाले, “जम्मू-काश्मीरची शांतता बिघडवू पाहणाऱ्यांशी आम्ही जशास तसे कठोरपणे वागू, असे मी आश्वासन देतो.”
जम्मू-काश्मीरमध्ये सुरू झालेला विकासाचा प्रवास कोणताही अडथळा रोखू शकणार नाही, असे शहा म्हणाले. शहा यांनी दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी विरोधकांवरही निशाणा साधला.युथ क्लबच्या सदस्यांना संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले की, मागील सरकारांनी ७० वर्षांत जम्मू -काश्मीरला काय दिले? ८७ आमदार, ६ खासदार आणि तीन कुटुंबे. पंतप्रधान मोदींनी पंचायत निवडणुकीत सुमारे ३० हजार निवडून दिलेले प्रतिनिधी देण्याचे काम केले आहे, जे आज लोकांची सेवा करत आहेत.
शहा म्हणाले की, सध्या जम्मू -काश्मीरमधील युवक विकास, रोजगार आणि शिक्षणाविषयी बोलत आहेत. हा एक प्रचंड बदल आहे. मी तुम्हाला खात्री देतो की जम्मू-काश्मीरची शांतता बिघडवणारे आहेत त्यांना अजिबात क्षमा नाही. शहा म्हणाले, आता कोणी कितीही जोर लावला तरी बदलाचे वारे आता कोणीही थांबवू शकणार नाही.
हे ही वाचा:
१४ वर्षांनी संपला काडीपेटीचा वनवास!
वन अविघ्न पार्क इमारत आगप्रकरणी गुन्हा दाखल
मास्क न घालणारे राज ठाकरेच कोरोनाग्रस्त
धक्कादायक! अल्पवयीन मुलाने पत्नीलाच विकले
शाह यांनी त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी श्रीनगरमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. राजभवन येथे झालेल्या बैठकीत शहा यांनी अल्पसंख्याक आणि स्थानिक नसलेल्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती घेतली. अलीकडच्या काळात दहशतवाद्यांकडून बिगर काश्मिरी आणि हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष्य करून हत्या केल्या जात आहेत. गेल्या १५ दिवसांत ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.