लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सभांचा धडाका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने कराड येथे सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच फेक व्हिडीओचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे.
नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ एडीट करून तेलंगाना काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी तेलंगानाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना समन्स देखील बजावण्यात आले आहे. याचं मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी कराडमधून काँग्रेसवर हल्लाबोल केला. “आमचे फेक व्हिडिओ पसरवले जात आहेत, कधी माझा आवाज, कधी अमित शाह यांचा आवाज तर कधी नड्डां यांच्या आवाजामध्ये व्हिडिओ पसरवले जात आहेत. हे व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पसरवले जात आहेत. त्याला बळी पडू नका,” असे आवाहन करत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.
“जे कामाच्या जोरावर एनडीएशी राजकीय लढाई लढू शकत नाहीत, ते आता सोशल मीडियावर खोटे व्हिडिओ पोस्ट करत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून माझ्या आवाजात, अमित शाह यांच्या आणि जेपी नड्डा यांच्या आवजात अशा गोष्टी पसरवत आहेत ज्याचा आम्ही कधी विचारही केला नाही. त्यामुळे असे व्हिडिओ फॉरवर्ड करताना विचार करा. हे व्हिडिओ आपल्यासमोर आल्यास पोलिसांना माहिती द्यावी,” असं नरेंद्र मोदी म्हणाले. या संदर्भात निवडणूक आयोगाने सुद्धा त्याची दखल घ्यावी असे ते म्हणाले. देशामध्ये वातावरण बिघडण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली.
“सातारा हा प्रत्येक देशभक्तासाठी, प्रत्येक भारत भक्तासाठी तीर्थक्षेत्राहून कमी नाही. जेव्हा २०१३ मध्ये मला भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान होण्याची संधी दिली तेव्हा मी थेट रायगडावर गेलो. तेथे गेलो तेव्हा त्या ठिकाणी ध्यानस्थ होऊन नतमस्तक झालो; हे माझे सौभाग्य आहे,” अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“साताऱ्याची भूमीही शौर्याची भूमी आहे. मिलिटरी अपशिंगे गाव असो किंवा मिलिटरी परिवार असोत. साताऱ्याचा कोणताही सैनिक परिवार असेल, आत्मनिर्भर भारतीय सेनेला पाहून ते सर्वात जास्त आनंदी आहेत. आपल्या सेनेकडे आज एकापेक्षा एका भारतीय बनावटीचे हत्यारे आहेत. आता तुम्हीच सांगा, असे कामे करुन मोदींनी ज्यांची दुकाने बंद केली ते खूश होतील का? हत्यारांच्या ज्या दलालांना काँग्रेसचं सरकार खूप चांगलं वाटतं होतं ते मोदीची वाहवाह करतील का?” असे प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केले.
“सैनिक कुटुंबांना ‘वन रँक वन पेन्शन’ची गॅरंटी दिली होती. आम्ही ही गॅरंटी पूर्ण करुन दाखवली. कोण कसं विसरु शकतं की काँग्रेसने ४० वर्षांपर्यंत सैनिक कुटुंबांना ‘वन रँक वन पेन्शन’ पासून वंचित ठेवलं होतं. खोटं बोलण्यात त्यांची मास्टरी आहे. भाजपाच्या सरकारने या योजनेचे १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे माजी सैनिकांना देऊन टाकले आहेत,” असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
“देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. तरीही काँग्रेसने गुलामीच्या मानसिकतेला फुलू दिलं. संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारला मानतं. जगात जेव्हा नौसेनाचा विषय निघतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. पण, इतक्या वर्षांपर्यंत स्वतंत्र भारताच्या नौसेनेमध्ये इंग्रजांच्या पाऊलखुणा होत्या. आमच्या सरकारने त्या इंग्रजांच्या पाऊलखुणा हटवल्या. शिवाय या झेंड्याची ताकद तेव्हाच वाढेल जेव्हा नौसेनाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीकला स्थान दिलं जाईल. आम्ही ते स्थान दिलं. आमच्या सरकारने मराठा सेनेद्वारे बनवण्यात आलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत सहभागी करण्यासाठी अर्ज केला आहे. महाराष्ट्राचा लोहगड, सिंधुदुर्ग असेल, किंवा मराठा सैनिकांकडून तामिळनाडूत बनवण्यात गेलेला जिंजी किल्ला असेल, या सगळ्यांना वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा..
अमित शहांच्या फेक व्हीडिओप्रकरणी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीना समन्स
नागपूर, जयपूर आणि गोवा विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!
मानखुर्दमध्ये लव्ह जिहाद: निजामने हिंदू तरुणीची केली हत्या, शरीराचे तुकडे करून भरले बॅगेत!
हुथी दहशतवाद्यांचा तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला!
“भारताचा जगात गौरव झाला तर काँग्रेसला त्याचा त्रास होतो. काँग्रेसने ७० वर्षांपैकी ६० वर्ष देशावर राज्य केलं. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेलं संविधान काश्मीरमध्ये लागू होत नव्हेत. कलम ३७० ची भिंत निर्माण केलेली होती. पण, आपल्या आशीर्वादाने आपला सेवक नरेंद्र मोदीने कलम ३७० ला उद्ध्वस्त केलं. कब्रस्तानमध्ये गाडून टाकलं. कलम ३७० हटवून देशाच्या एकात्मतेला ताकद मिळाली की नाही? जी गॅरंटी दिली होती. ती गॅरंटी पूर्ण केली,” असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.