नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या भाजप नेत्या आणि खासदार साध्वी प्रज्ञा यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केले आहे. त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये महिला आणि मुलींनी हिजाब घालण्यावर आक्षेप घेतला आहे. बुधवारी भोपाळमधील एका कार्यक्रमात त्यांनी त्यांची मते मांडली आहेत. त्या म्हणाल्या,” भारतात हिजाब घालण्याची गरज नाही. स्वतःच्या घरात हिजाब घालावा, ज्या लोकांना त्यांच्या घरात अस्वस्थता किंवा असुरक्षित वाटत आहे त्यांनी त्यांच्या घरात हिजाब घालणे आवश्यक आहे.”
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींनी हिजाब घालण्यावरून कर्नाटकच्या काही भागांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे. गेल्या महिनाभरापासून या मुद्द्यावरून राज्यभरात तीव्र आंदोलने होत आहेत. या वादाला उत्तर देताना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, विद्यार्थी शाळेत जातात तेव्हा शाळेचा गणवेश घालतात आणि शैक्षणिक संस्थांची शिस्त पाळतात. तुमच्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांविरुद्ध बुरखा वापरला पाहिजे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, हिंदू त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहत नाहीत कारण ते स्त्रियांची पूजा करतात. येथे महिलांची पूजा केली जाते ही सनातनची संस्कृती आहे. महिलांचे स्थान सर्वोपरि असलेल्या या देशात हिजाब घालण्याची गरज नाही.”
हे ही वाचा:
चांदीवाल आयोगासमोर नवाब मलिकांचा खुलासा! म्हणाले…
ठाणे-दिवा दोन नव्या रेल्वे मार्गिकांचे पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण
संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
तळपत्या रवी, सूर्या समोर वेस्ट इंडीजचा संघ ढेर
“हिंदू विद्यार्थी गुरुकुलमध्ये भगवी वस्त्र घालून जातात. पण शाळा-कॉलेजांमध्ये ते गणवेशच घालून जातात. मुस्लिमांनी देखील मशिदीमध्ये काहीही घालावे, लोकांना त्याने काही फरक पडत नाही, पण शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालण्याची काही गरज नाही. त्यावेळी त्यांनी हिजाब आणि खिजाबची तुलना केली. त्या म्हणाल्या खिजाब हा वय लपवण्यासाठी केला जातो तर हिजाब हा चेहरा लपवण्यासाठी केला जातो. असे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सनातन महापंचायतीच्या कार्यक्रमात माहिती दिली आहे.