मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील हे गेले १५ दिवस उपोषणाला बसले असून सरकार त्यांच्या मागण्यांचा आढावा घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेते जरांगे पाटलांची भेट घेत असून मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी आंदोलनस्थळी संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर आणि संभाजी भिडे पोहचले होते.
यावेळी सरकारच्या वतीने संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर यांनी जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर, संभाजी भिडे यांनीही आंदोलन स्थळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या लढ्याला शिवप्रतिष्ठानचा पाठींबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच ही लढाई एक घाव दोन तुकड्यांची नाही. जसं पाहिजे तसं, आरक्षण मिळालं पाहिजे, असं संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितले.
“अजित पवार हे काळीज असलेले माणूस आहेत. एकनाथ शिंदे लबाड नाहीत. देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत. तुम्ही उपोषणा थांबवा, लढा थांबवू नका,” असं वक्तव्य करून संभाजी भिडे यांनी जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
आरक्षण मिळवूनच या लढ्याचा शेवट झाला पाहिजे, अशी भूमिका संभाजी भिडे यांनी मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत, सर्व सोबत आहोत. इथे दिखाव्यासाठी आलेलो नाही. मागे वळून पाहायचं नाही. मराठा समजाला पाहिजे तसं आरक्षण मिळालं पाहिजे. जे करत आहात ते १०१ टक्के योग्य आहे. एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे, सध्या जे सत्तेवर आहेत, ते अजित पवार काळीज असलेला माणूस. शिंदे लबाड नाहीत. फडणवीस बेईमानी करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे ही वाचा:
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार; तीन अधिकाऱ्यांचे निलंबन
G-20 नंतर पाकिस्तानी नागरीक आपल्याच सत्ताधाऱ्यांना देऊ लागले दोष
देवेगौडा येणार भाजपासोबत, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती
साताऱ्यात आक्षेपार्ह पोस्टवरून राडा; जाळपोळ, दगडफेकीच्या घटना
कौतुक करावं असं आंदोलन आहे. येथे उपदेश करायला आलेलो नाही. तुम्ही करताय ती, धर्माची समाजसेवा आहे, या तपश्चर्येचे फळ नक्की मिळणार. जे सत्य आहे त्याबाजूने लढाई यशस्वी होणार. मराठा समाज हा हिंदुस्थानचा पाठीचा कणा, आत्मा असलेला समाज आहे. उपोषण थांबवा लढा थांबवू नये” असं आवाहन संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलं.