सोमवार, २२ जुलै रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाविषयी भाष्य करत असतानाचं विरोधकांना संसदेत होणाऱ्या गदारोळावरून सुनावले आहे. संसदेचे हे अधिवेशन सकारात्मक, सर्जनशील आणि देशवासीयांच्या सुधारणेचा भक्कम पाया घालणारे असावे, अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. शिवाय या अर्थसंकल्पाकडे देशाचे बारकाईने लक्ष आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांची देखील कानउघडणी केली आहे.
श्रावणी सोमवार असून आजपासून एक महत्त्वाचं सत्र सुरु होत आहे. देशवासीयांना यासाठी शुभेच्छा असं नरेंद्र मोदी म्हणाले. भारताच्या लोकशाहीच्या गौरवयात्रेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अधिवेशन. तब्बल ६० वर्षांनी एक सरकार तिसऱ्यांदा परतलं आहे. तिसऱ्या वेळचा पहिला अर्थसंकल्प मांडत आहोत. भारताच्या लोकशाहीच्या गौरवयात्रेचं हे रुप आहे. देशाच्या जनतेला जी गॅरंटी दिली आहे त्या सगळ्या आश्वासनांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढे जात आहोत. हे बजेट अमृतकाळातलं महत्त्वाचं बजेट आहे. आम्हाला पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे, त्याची दिशा करणारं बजेट असेल. २०४७ ला जो विकसित भारत असेल त्याचा पाया घालणारं हे बजेट असणार आहे, असा ठाम विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
देशातील सर्व खासदारांना नरेंद्र मोदींनी सल्ला दिला दिला आहे. “गेल्या जानेवारीपासून आमच्याकडे जी काही सत्ता होती तेवढी लढाई केली. जनतेला जे काही सांगायचे होते ते सांगितले. काहींनी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, काहींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. देशवासीयांनी आपला निकाल दिला आहे. आता निवडून आलेल्या खासदारांची आणि राजकीय पक्षांची जबाबदारी आहे की, आगामी पाच वर्षे देशासाठी लढण्याची प्रतिज्ञा घेण्याची.”
हे ही वाचा:
एनसीईआरटीच्या पुस्तकात आता ‘हडप्पा संस्कृती’चा उल्लेख ‘सिंधू सरस्वती संस्कृती’
जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करी चौकीवर दहशतवाद्यांचा हल्ला; जवानांकडून चोख प्रत्युत्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची निवडणुकीतून माघार
बांगलादेशातील ५६ टक्के आरक्षण रद्द, ९३ टक्के जागा गुणवत्तेवर भरणार !
भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारत हा सर्वात वेगाने वाढणारा देश आहे, ही प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. गेली तीन वर्षे आपण सतत ८ टक्के वाढीसह पुढे जात आहोत,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरे संसद अधिवेशन सोमवार सुरू झाले आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात १६ बैठका असतील.