यंदाचा अर्थसंकल्प नवा आत्मविश्वास, ऊर्जा देईल!

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला विश्वास

यंदाचा अर्थसंकल्प नवा आत्मविश्वास, ऊर्जा देईल!

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाबाहेर जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी लक्ष्मी देवीची प्रार्थना करत गरीब आणि मध्यमवर्गीयांवर लक्ष्मी देवीचे आशीर्वाद असावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी नवीन आत्मविश्वास आणि ऊर्जा देईल.

देशाने घेतलेल्या विकसित भारताच्या संकल्पाच्या दिशेने यंदाचा अर्थसंकल्प नवी ऊर्जा देईल

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आपल्या प्रजासत्ताकाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. या देशातील जनतेने मला तिसऱ्यांदा ही जबाबदारी दिली आहे आणि या तिसऱ्या टर्ममधील हे पहिले पूर्ण अर्थसंकल्प आहे. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की २०४७ मध्ये, जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करू, तेव्हा हे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक नवा आत्मविश्वास निर्माण करेल आणि या देशाने घेतलेल्या विकसित भारताच्या संकल्पाच्या दिशेने आपल्याला नवी ऊर्जा देईल.”

कोणतीही विदेशी ठिणगी उडाली नसल्याचे पहिलेच सत्र

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या विदेशी शक्तींवर निशाणा साधला, जे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१४ नंतर हे पहिलेच अधिवेशन असेल जेव्हा अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधी कोणतीही परदेशी ठिणगी उठलेली नाही आणि परदेशातून आग लावण्याचा प्रयत्न झालेला नाही. २०१४ पासून मी पाहत आलो आहे की प्रत्येक अधिवेशनापूर्वी काही लोक गैरप्रकार करायला तयार असतात. हे पहिलेच सत्र आहे ज्यात यापूर्वी असे काहीही झाले नाही. परदेशातून ठिणगी पेटवणाऱ्या लोकांची कमी नाही आणि त्याला हवा देणाऱ्यांची आपल्याकडे कमी नाही. प्रत्येक अधिवेशनापूर्वी लोक खोडसाळपणा करायला तयार असतात आणि इथे खोड्या करणाऱ्यांची कमतरता नाही. कोणतीही विदेशी ठिणगी दिसत नसल्याचे हे पहिलेच सत्र असावे, असा उपरोधिक टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला.

स्त्री शक्ती आणि युवा पिढीवर खास लक्ष

अर्थसंकल्पात महिलांच्या संदर्भात काही विशेष घोषणा केल्या जाऊ शकतात, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, प्रत्येक महिलेला सन्मान आणि समान हक्क मिळणे महत्त्वाचे आहे. स्त्री शक्तीचा अभिमान आपल्याला प्रस्थापित करायचा असून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्त्री शक्तीला चालना देण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच युवा पिढीवरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, विकासाचा वेग वाढवायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुधारणा आणि लोकसहभाग, ज्यामुळे मोठे बदल दिसून येतील. आपला देश तरुण आहे आणि आपल्याकडे अफाट युवा शक्ती आहे. जे तरुण आज २०- २५ वर्षांचे आहेत, ते जेव्हा ४५- ५० वर्षांचे होतील तेव्हा ते विकसित भारताचे सर्वात मोठे लाभार्थी होणार आहेत.

हे ही वाचा : 

हमासकडून सहा महिन्यांनंतर लष्करी नेता मोहम्मद डिफच्या मृत्यूची पुष्टी

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; १६ विधेयके सूचीबद्ध!

प्रयागराज: महाकुंभ परिसरात पुन्हा आग!

मुंबईच्या चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम कोसळले; जीवितहानी नाही

अर्थसंकल्पामुळे नवीन आत्मविश्वास निर्माण होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आम्ही मिशन मोडमध्ये आहोत आणि या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेतले जातील, एकूणच या अर्थसंकल्पामुळे नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विकसित भारताला नवी ऊर्जा देईल. देश मजबूत होईल असे कायदे केले जातील. पुढील २५ वर्षे दृढ निश्चयाने समृद्ध भारतापर्यंत पोहोचण्याचा आणि कर्तृत्वाच्या शिखरावर पोहोचण्याचा मानस आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा आमचा संकल्प असून यावेळचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार आहे.

मतं मिळाली मग गेली कुठं ?  | Amit Kale | Raj Thackeray | Maharashtra Navnirman Sena | EVM |

Exit mobile version